मुंबई : शिवसेनेनं काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावतेंचा पत्ता कापला गेलाय. प्रियंका चतुर्वेदींच्या उमेदवारीसाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आग्रही होते. त्यामुळेच त्यांना संधी देण्यात आल्याचं समजतंय. चतुर्वेदींमुळे शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर चेहरा मिळालाय. असे असले तरी मोठ्या नेत्यांना डावलल्याची देखील चर्चा शिवसेनेच्या गोटात होत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवर दिवाकर रावतेंची प्रतिक्रिया अद्याप आली नाही. त्यांची यावरील प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे.
पक्षानं राज्यसभेची उमेदवारी डावलल्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे नाराज आहेत. संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळालं असतं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली आहे. मला नव्हे तर माझ्या शहराला खासदारकीची गरज होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसकडून माजी खासदार राजीव सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सातव उद्या राज्यसभेचा अर्ज दाखल करतील अशी माहिती आहे. सातव यांनी लोकसभा लढवली नव्हती. त्यावेळी सातव यांच्याकडे पंजाब आणि गुजरात निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी होती. काँग्रेसकडून मुकुल वासनीक, सुशीलकुमार शिंदे यांची नावं चर्चेत होती.
राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले, उदयनराजे भोसले आणि भागवत कराड अशा तिघांना उमेदवारी देण्यात आलीय. यामुळं संजय काकडे आणि एकनाथ खडसे यांच्यासारख्या इच्छुकांचं स्वप्न भंगलंय.