राज्यातील 'या' 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी, तर 2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट  

Updated: May 13, 2022, 07:54 AM IST
राज्यातील 'या' 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून अलर्ट title=

मुंबई : एककीडे विदर्भात उष्णतेची लाट कायम असताना अचानक नागपुरात पावसाचा शिडकावा झाला. नागपूर शहरात अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. 40 अंशावरील तापमान आणि उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना संध्याकाळी वातावरण बदललं. 

नागपुरात अनेक भागात हलक्या पावसानं नागरिकांना दिलासा दिला. पण या हलक्या पावसामुळे आज पुन्हा उकाडा वाढणार आहे. दुसरीकडे अमरावतीच्या नेरपिंगळाई भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. 

नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावतीमध्ये अनेक भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

अमरावतीमध्ये पुढचे दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

भंडारा जिल्ह्यात वादळी वा-यासह वीज कोसळली. यात तुमसर तालुक्यातील लेडेझरी इथे 6 शेळ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या शेळ्या शेतात शेळ्या चरत असताना वीज कोसळली आणि त्यात त्यांचा अंत झाला.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. ऐन काढणीला आलेले पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. उन्हाळी सोयाबीन, मुग, भुईमूग या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.