कोकणात जाणारी 'ही' वाट धोक्याची; सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालील मातीची मोठ्या प्रमाणात धूप

Parshuram Ghat Landslide: परशुराम घाट असुरक्षित संरक्षक भिंतीचा आणखी एक भाग कोसळला सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालील मातीची मोठी धूप

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 17, 2024, 10:32 AM IST
कोकणात जाणारी 'ही' वाट धोक्याची; सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालील मातीची मोठ्या प्रमाणात धूप title=
Heavy rain triggers major landslides in Parshuram Ghat

Parshuram Ghat Landslide: परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकुळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. परतीच्या पावसाने कोकणालाही झोडपले आहे. या पावसात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. या घटनेमुळं दरडीकडील संरक्षक भिंत व दरडीची बाजू धोकादायक झाली आहे. त्यामुळं कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेला परशुराम घाटा आता धोकादायक झाला आहे. 

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा महत्त्वाचा रस्ता आहे. आधीही विविध कामांसाठी परशुराम घाट बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता मंगळवारी आलेल्या मुसळधार पावसामुळं घाटातील संरक्षक भिंत मध्यरात्री कोसळली. त्यामुळं पुन्हा एकदा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा दर्जा समोर आला आहे. बुधवारपासून या महामार्गावरची वाहतूक एकेरी लाईनमध्ये सुरू आहे. 

दोन ते तीन वर्ष परशुराम घाट हा पूर्णपणे खोदून तयार करण्यात आला होता. मात्र अद्यापही या महामार्गावर दरड कोसळणे आणि डोंगर खचणे सुरूच आहे. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आजही परशुराम घाटाची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. संरक्षक भिंतीचा आणखी एक भाग कोसळला आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालील मातीची मोठी धूप झाली आहे. त्यामुळं महामार्गाचा काँक्रीटचा रस्ता केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

महामार्गावरील एक लाईन बंद असले तरी दुसऱ्या लाईनलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उर्वरित संरक्षक भिंतही कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळून दरडीचा भागही पूर्णपणे कोसळला आहे. त्याच ठिकाणी टेलिफोन केबल होती. मात्र, संरक्षक भिंत कोसळल्याने ती केबलही तुटली आहे. त्यानंतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. 

दरम्यान, पावसाळ्यात परशुराम घाटात चोवीस तास देखरख ठेवण्यात आली होती. दरड कोसळल्यानंतर डंपर, जेसीबी तैनात ठेवण्यात आले होते. मात्र, परतीचा पाऊस सुरू होताच यंत्रणा काढून घेण्यात आली होती. अशातच मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस सुरू झाला असतानाच परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली