Interstellar full movie : काही चित्रपट हे इतके कमाल पद्धतीनं साकारण्यात येतात, की या चित्रपटांतील प्रत्येक दृश्य हैराण करून जातं. पहिल्या दृश्यापासून अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत उत्कंठा वाढवणारा आणि अखेरच्या क्षणापर्यंत कथानकाला कलाटणी देणारा असाच एक चित्रपट म्हणजे क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित 'इंटरस्टेलर' (Interstellar).
जवळपास 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आलं आणि तगजी आव्हानं असतानाही या चित्रपटानं 120 कोटींची कमाई केली. चित्रपटाला प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून दिग्दर्शक नोलनही थक्क असून, आपण कायम चाहत्यांप्रती कृतज्ञ असल्याचीच प्रतिक्रिया त्यानं दिली. आयमॅक्स थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटानं 'पुष्पा 2' सारख्या चित्रपटाचं आव्हान असतानाही कमाल कामगिरी केली.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड घेत साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून कथानकाला जोड मिळाली होती ती वास्तवदर्शी पात्रांची आणि नात्यांमधील आपुलकीची. आश्चर्य म्हणजे नोलनचे चित्रपट म्हणजे तुमल्या कल्पनाशक्तीला शह देणारं कथानक असं अलिखित समीकरण असल्यामुळं आजही म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होऊ 10 वर्ष उलटूनही चित्रपटाचं कथानक अनेकांनाच उलगडलं नाही. जाणून घ्यायचंय काय आहे या चित्रपटाच्या Climax चा नेमका अर्थ?
बऱ्याच प्रेक्षकांना 'इंटरस्टेलर' हा चित्रपट सायंटिफिक, सायन्स फिक्शन, फिजिक्स, स्पेस आणि क्वांटम स्पेस थ्रिलर वाटतो. पण, एक नक्की आहे की या चित्रपटाची मुख्य थीम बाप लेकीमधील जिव्हाळ्याच्या नात्यावर, त्यांच्यातील प्रेमावर आधारित आहे. एक बाप आपली मुलगी 11 वर्षांची असताना एका महत्त्वाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी तिला आश्वासन देतो, की मी नक्की तुला भेटायला परत येईन.
पृथ्वी राहण्यायोग्य नसते. मग तो बाप आपल्या मुलीला राहण्याकरिता विविध ग्रहांचा शोध घेत असतो. या दरम्यान तो टाईम ट्रॅव्हल करतो (Time Travel). निसर्गाचे नियम मोडतो आणि जेव्हा पृथ्वीवर परत येतो तेव्हा 36 वर्षांच्या या बापाचं वय किंचित वाढलेलं असतं आणि त्याची मुलगी 100+ वर्षांची झालेली असते. त्यांची ही भेट आणि क्रिस्टोफर नोलानचं ते प्रेझेंटेशन यामुळे एकूणच तुमच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही.
जेव्हा मुख्य भूमिकेत असणारा (Matthew McConaughey) तो परततो तेव्हा ती पृथ्वी नसून एक कृत्रिम स्पेस स्टेशन (कूपर स्टेशन) असतं. जिथं माणसानं सर्व्हाईव्ह करण्याची कला शिकलेली असते. अशात 102 वर्षांची मुलगी आपल्या 36 वर्षांच्या बापाला सांगते की मी जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय. पण तू अजून तरुण आहेस. तुला जगायचंय. मला मरताना पाहू नकोस. कुणी तरी आहे जी एका प्लॅनेटवर तुझी वाट बघतेय, तू तिथं जा आणि कूपर स्पेसशिप घेऊन तिथे पसार होते आणि याच वळणावर हा अद्वितीय कथानकाचा चित्रपट संपतो.