कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : नोकरीच्या भीतीने एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. अक्षय माटेगावकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात आपण का आत्महत्या करत असल्याचं कारण लिहिलं आहे. पोलिसांना ही चिठ्ठी मिळाली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
नेमकी घटना काय?
अक्षय माटेगावर हा तरुण आई-बाबा आणि बहिणीसह सुसगाव परिसरात रहात होता. अक्षय अभ्यासात हुशार होता, सिंबायोसिस इन्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. अक्षय उच्चशिक्षित कुटुंबातला होता. अक्षयेच वडिल अमोल माटेगावकर मेकॅनिकल इंजिनिअर असून ते एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर आहेत. तर आई मीनल माटेगावकर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिलल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या हेड आहे. बहिण आकांक्षा एमआयटीमध्ये डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
अक्षयने आज पहाटेच्या सुमारास रहातल्या घरातल्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्ये केली. आत्महत्येपूर्वी अक्षयने चिठ्ठी लिही होती. यात त्याने मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे, असा उल्लेख केला आहे.
अक्षयच्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.