काल कोरोना पॉझिटिव्ह...आज निगेटीव्ह....कोरोना चाचणी किती खरी किती खोटी?

कोरोना रूग्णांची संख्या दररोज 30-40 हजाराच्या घरात येतेय. त्यामुळे राज्याची चिंता वाढलीय. पण कोरोना चाचणीच्या रिपोर्टवरून आता एक वेगळाच संभ्रम निर्माण झालाय. नाशिक शहरात एकाच रात्रीतून पॉझिटिव्ह रूग्णांचा निकाल निगेटिव्ह आलाय. 

Updated: Mar 30, 2021, 07:29 PM IST
काल कोरोना पॉझिटिव्ह...आज निगेटीव्ह....कोरोना चाचणी किती खरी किती खोटी?

मुंबई : कोरोना रूग्णांची संख्या दररोज 30-40 हजाराच्या घरात येतेय. त्यामुळे राज्याची चिंता वाढलीय. पण कोरोना चाचणीच्या रिपोर्टवरून आता एक वेगळाच संभ्रम निर्माण झालाय. नाशिक शहरात एकाच रात्रीतून पॉझिटिव्ह रूग्णांचा निकाल निगेटिव्ह आलाय. 

नाशिकमधल्या इंदूबाई अहिरेंना पॅरालिसीसचा त्रास होत असल्यानं रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 28 मार्चला सुप्रीम लॅबने त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिला. इंदूबाईंना कोणतीच लक्षणे दिसत नसल्याने त्यांच्या मुलाने फेरचाचणीचा आग्रह धरला. तेव्हा 29 मार्चला त्याच लॅबने इंदूबाईंचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं. 

अगदी असाच अनुभव पुण्यातल्या दत्तात्रय साळुंखे यांनाही आला आहे. अस्वस्थ वाटत असल्यानं 20 मार्चला ते औंध इथल्या मेडिपॉईंट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. 21 मार्चला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. 22 मार्चला रूग्णालय प्रशासनासोबत बिलावरून वाद झाल्याने त्यांनी हॉस्पिटल सोडले. कोरोनाची खातरजमा करून घेण्यासाठी 23 मार्चला त्यांनी पुन्हा टेस्ट केली तेव्हा ती निगेटीव्ह आली. 

अशाच प्रकारच्या तक्रारी वारंवार येत असल्यानं. पुणे महापालिका प्रशासनामार्फत लॅब मधील चाचण्यांवर लक्ष ठेवण्यात येतंय. त्यासाठी विशेष पथकाची नेमणूकही करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

हे केवळ नाशिक पुण्यातच नव्हे तर इतर ठिकाणीही घडत असल्याचे समोर येत आहे. साता-यात चक्क कोरोनाची बोगस चाचणी करून लुबाडल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोग्यमंत्र्यांनीही अशा बोगस लॅबवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनामुळे लोक आधीच पिचले आहेत. त्यात डॉक्टर आणि लॅबचालकांकडून लूट होत असल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरलीय.