कानपूरमध्ये एसीपी मोहसिन खान यांच्यावर आयआयटी विद्यार्थिनीने लग्नाचं आमिष देत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून, तपास सुरु केला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने कोर्टात न्यायाधीशांसमोर आपला जबाब नोंदवला आहे. सांगितलं जात आहे की, कोर्टात एसीपी मोहसीन यांचं नाव घेताना आयआयटी विद्यार्थिनी थरथरत होती. ती सतत पाणी मागत होती. यावेळी तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं. आपल्याकडे व्हिडीओच्या माध्यमातून अनेक पुरावे असल्याचंही तिने सांगितलं आहे.
आयआयटी विद्यार्थिनीने कोर्टात पुन्हा एकदा तोच घटनाक्रम सांगितला, जो एफआयरमध्ये नोंद आहे. यामध्ये मोहसीनला केलेल्या पहिल्या मेसेजपासून शेवटच्या मेसेजपर्यंतचा उल्लेख आहे. पीडितेने कोर्टात सांगितलं की, मोहसीन खानने आपल्याला त्याच्यात आणि पत्नीतील नात्यात दुरावा असल्याचं म्हटलं होतं. यामुळेच ते दोघे वेगवेगळ्या बेडरुममध्ये झोपतात. खोटी बतावणी करुन मोहसीनने आपल्यासह दुष्कृत्य केलं. विरोध केला असता आपण लवकरच पत्नीला घटस्फोट देणार असल्याचं तो म्हणाला.
बलात्काराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या एसआयटी टीमने आयआयटी कानपूरमध्ये जाऊन इतर विद्यार्थ्यांचा जबाबही नोंदवला आहे. तर आयआयटी हॉस्टेलच्या जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये मोहसीन दिसले आहेत. काही ठिकाणी पीडित आणि आरोपी एकत्र दिसले आहेत. तसंच आयआयटीतील वेगवेगळ्या प्रवेशद्वारांमधून आत येताना आणि बाहेर जाताना पाहिल्याचेही अनेक साक्षीदार आहेत.
दरम्यान या प्रकरणानंतर मोहसीन खान नेमके कुठे आहेत ? याबद्दल विचारणा होत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण खटला दाखल झाल्यापासून मोहसीन आपल्या घरी पोहोचलेले नाहीत. कोर्टात जबाब नोंदवल्यानंतर आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी अद्याप बलात्कार आरोपी मोहसीन खानला अटक केली नसली तरी आरोपीला आपला बचाव करण्यासाठी वेळ दिल्याचा आरोप केला आहे. कारण पोलीस पाच दिवसांपासून फक्त तपास करण्याबद्दल बोलत आहेत. दुसरीकडे पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यात बलात्कार झाल्याचं सिद्द झालं आहे.