माणुसकी मेली! अपघातानंतर तो मदत मागत होता, तडफडत होता अखेर अंत

अपघातानंतर तब्बल तासभर जखमी मदतीसाठी विनवणी करत होता, मात्र लोकांची गर्दी फक्त फोटो काढण्यात आणि व्हिडीओ करण्यातचं दंग होती, मदत उशीरा मिळाली आणि त्या मुलाचा अंत झाला. 

Updated: May 4, 2019, 08:45 PM IST
माणुसकी मेली! अपघातानंतर तो मदत मागत होता, तडफडत होता अखेर अंत title=

औरंगाबाद : माणसांमधील माणुसकी संपत चालली की काय असा एक प्रश्न औरंगाबादेतील एका घटनेनं पुन्हा समोर आला. अपघातानंतर तब्बल तासभर जखमी मदतीसाठी विनवणी करत होता, मात्र लोकांची गर्दी फक्त फोटो काढण्यात आणि व्हिडीओ करण्यातचं दंग होती, मदत उशीरा मिळाली आणि त्या मुलाचा अंत झाला.. माणुसकली काळीमा फासणारी ही घटना औरंगाबादेत ३० एप्रिलला घडली आणि नंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सत्यता समोर आली. 

ही अपघाताची दृश्यं आहेत औरंगाबादच्या सुमीत कवडेची. सुमीत ३० एप्रिलला मित्रांसोबत दौलताबादच्या हॉटेलमधून जेवून औरंगाबादकडे येत होता. यावेळी त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. सुमीत आणि त्याचा मित्र रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली. यावेळी गर्दीतल्या लोकांनी त्यांची मदत करणे अपेक्षित होते. गर्दीतून मदतीचे हात येण्याऐवजी. गर्दीतल्या हातांमध्ये मोबाईल दिसले. गर्दीतल्या बघ्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं. पण त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी कोणीही पुढं आला नाही. वैद्यकीय मदत मिळण्यात उशीर झाल्याने दुर्दैवाने सुमीतचा मृत्यू झाला, अशी माहिती सुमीतची आई सुनीता यांनी सांगितले.

सुमीतचे काका, स्वत: अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या एका संस्थेसाठी काम करतात. मात्र त्यांच्याच घरच्या मुलाला या वाईट प्रसंगाला सामोर जाव लागल्याची खंत त्यांना आहे. राकेश कवडे यांनी याबाबत खंत व्यक्त केली. दरम्यान, लोक आत्मकेंद्रीत होताय, असले अपघात रक्त पाहण्याची आसक्ती लोकांना झाली आहे आणि त्यातून मदत करण्याती वृत्ती हरपत चालल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसोपचार तज्ज्ञ विभाग प्रमुख अपर्णा अष्टपुत्रे यांनी सांगितले.

यांत्रिकीकरणाच्या ओघात माणूस संवेदनाहीन झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या माणसाला मदत करण्याऐवजी इतर माणसं त्यांचे व्हिडिओ काढण्यात कसे दंग राहू शकतात असा सवाल विचारला जातोय.