IAS Pooja Khedkar Controversy: ट्रेनी आयएएस पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी कमी होता दिसत नाहीयत. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. खासगी गाडीला लाल दिवा लावल्याने खेडकर अडचणीत आल्या होत्या. यानंतर त्यांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण समोर आलं. हे कमी म्हणून की काय,त्यांच्या आईचा बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला. आता या सर्वाचाच पाढा वाचला जाणार आहे. कारण पोलीस महासंचालकांनी या संपू्र्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊया.
आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी मोटारीवर अंबरदिव्याचा वापर केला होता. तसेच खेडकर यांच्या आईने शेतकऱ्याला पिस्तुलाचा दाखवलेला धाक दाखवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आला.
पूजा खेडकर यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे.
मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शस्त्र परवान्याच्या अटी आणि शर्थींचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलीय. या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र वादात सापडले आहे. दिव्यांग नसताना त्यांनी केवळ सवलत मिळावी म्हणून खोटे प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप पूजा यांच्यावर आहे. याप्रकरणी पूजा खेडकरांची चौकशी केली जाणार आहे. दिव्यांगांची संघटना याबाबत आक्रमक झाली आहे. त्यांनी याप्रकरणी आयुक्तांकडे निवेदन दिलं होतं. त्यानुसार दिव्यांग आयुक्तांकडून पुणे पोलीसांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना कोणत्या रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं? यावेळी त्यांनी काय कागदपत्र जोडली होती? अशा सर्व प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
इथेच पूजा यांच्या अडचणी संपल्या नाहीत. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी आयएएस पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचा अहवाल मागवून घेतला आहे. आहे. पूजा खेडकर यांना अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय समितीतील सदस्यांचे खुलासे मागवण्यात आले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी हे आदेश काढले आहेत.