मान्सूनला अनुकूल स्थिती, इतक्या दिवसात दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार

 Monsoon Update : पावसाच्या आगमनाची बातमी. दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात मान्सून पोहोचणार आहे.  

Updated: May 19, 2022, 08:14 AM IST
मान्सूनला अनुकूल स्थिती, इतक्या दिवसात दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार  title=

मुंबई : Monsoon Update : मान्सूनसंदर्भात एक आनंदाची बातमी. पावसाच्या आगमन वेळेआधीच होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात मान्सून पोहोचणार आहे. मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनसाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र, विदर्भात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (The monsoon is expected to arrive four to five days in South Arabian Sea )

अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करीत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातही काही भागात पावसाची शक्यता आहे.

यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. असे असलं तरी विदर्भातील अमरावती आणि अकोल्यात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे. 

मान्सून संपूर्ण अंदमानात दाखल झालाय. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून दक्षिण-पूर्व, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 27 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्र राज्यातही मान्सूनचं आगमन होईल. 

केरळामध्येही जोरदार पाऊस

नैऋत्य मान्सूनने एक आठवडा अगोदरच संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे व्यापले आहेत आणि येत्या पाच दिवसांत या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी सांगितले. मान्सून केरळमध्ये किमान एक आठवडा लवकर येण्याची अपेक्षा होती. सध्या केरळमध्ये पाऊस पडत आहे. 

केरळामध्येही जोरदार पाऊस झाला. पावसानंतर अनेक सखल भागात पाणी साचलं. तर काही भागांमधला वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. कोट्टय्यममध्ये पावसाचा विशेष प्रभाव जाणवला, काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं.