मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिउष्णतेचा तडाखा सुरूच आहे. परंतू अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. कोकणाला पावसानं झोडपलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात गारवा आला. मात्र पिकांचंही नुकसान झालं.
कोल्हापूर जिल्ह्यात मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजेचा कडकडाट पाऊस झाला. या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना रात्र जागून काढावी लागली.सध्या पावसाने विश्रांती घेतलीय.
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बिलोली, देगलुर तालुक्यात सकाळी अवकाळी पाऊस बरसला. त्याआधी मध्यरात्री उशीराही काही तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालं.
पंढरपुरात सकाळीच अवकाळी पावसानं हजेरी लावली.. शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला.. पहाटेपासून शहरात ढगाळ वातावरण होतं..
सोलापुरात सकाळी वादळी वा-यांसोबत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं. कासेगावमधले शेतकरी नामदेव नवले यांच्या पाऊण एकर काढणीला आलेल्या द्राक्षबागेचं यात मोठं नुकसान झालं. यामुळे शेतक-यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवलं आहे.
जम्मू-काश्मीरसारख्या बर्फाच्छादित प्रदेशापासून ते संपूर्ण उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा बसतोय.
मध्य महाराष्ट्र ते विदर्भापर्यंत येत्या आठवड्यात उष्णतेची आणखी तापदायक लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे उष्णतेत तीव्र वाढ होणार आहे.