close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला इम्तियाज जलील यांची पुन्हा दांडी

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा सोडून ध्वजारोहणाला हजर झाले असताना खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र दांडी मारली.

Updated: Sep 17, 2019, 12:02 PM IST
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला इम्तियाज जलील यांची पुन्हा दांडी

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा दांडी मारली. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांना सोशल मीडियावर करण्यात आली होती. खासदार म्हणून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थिती मूळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल आहे. 

आमदार असताना गेली पाच वर्षे इम्तियाज जलील यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने मुक्तीसंग्राम दिनाला येणे टाळले होते. त्यात  एमआयएम , हैद्राबाद, ओवेसी आणि रझाकार यांचा संबंध असल्यानेच जलील येण्यास टाळाटाळ करतात का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानात हैदराबाद मुक्तीसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा सोडून ध्वजारोहणाला हजर झाले असताना खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र दांडी मारली. तर कार्यक्रमातील जलील यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली.

स्वामी रामानंद तीर्थ, आ. कृ . वाघमारे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी मोठा लढा दिला. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ हातात घेत हैदराबाद संस्थान विलीन करून घेतले. 
निजामाच्या जोखडातून मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. 

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.माझ्या उपस्थिती अथवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये. असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता लक्षात येते. देशभक्तीचे प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.