Solapur News : आजवर तुम्ही महागड्या किंमतीचे धष्टपुष्ट बैल पाहिले असतील.. पण कधी 42 लाखांचा, 7 फुट उंचीचा बैल पाहिलाय का? नसेल पाहिलात तर सोलापुरच्या कृषी प्रदर्शनाला नक्की भेट द्या.. कारण या कृषी प्रदर्शनात सोन्या बैल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय..कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच बैल म्हणून त्याची ओळख आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील हा बैल आहे. सैन्यातून निवृत्त झालेले हवालदार चन्नाप्पा आवटी सोन्याचं पालनपोषण करतायत 41 लाख रुपयांचा हा बैल आहे. 7 फूट उंच, 9 फूट लांब आहे. तब्बल 1 टनांहून अधिक वजन आहे. हा बैल महिन्याला 50 हजारांचा खुराक खातो. चन्नाप्पा आवटी या बैलापासून महिन्याला अडीच लाखांचं उत्पन्न कमवतात.
साता-यातील कृषी प्रदर्शनात चक्क दीड कोटींचा रेडा प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. या रेड्याला पाहण्यासाठी सातारकरांची तुफान गर्दी झाली होती. खुद्द उदयनराजेंना ही बातमी कळली तेव्हा त्यांनाही या रेड्याला पाहण्याचा मोह आवरता आला नाही.. त्यांनीही या कृषी प्रदर्शनाला भेट दिली.. दीड कोटीचा रेडा पाहून तेही चकित झाले.. त्यांनी या रेड्यासोबत फोटो सेशनही केलं.
बुलढाणा जिल्ह्यातील करवंड गावात 51 लाखांच बोकड पहायला मिळाला होता. याचे नाव टायगर होते. हा रुबाबदार टायगर....उंच पुरा टर्रेबाज गडी, मोठं कपाळ...मजबूत बांधा... ताकद तर एव्हढी की दोन-तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. अशा या राजबिंड्या टायगरला पाहण्यासाठी जिल्हाभरातून गर्दी झाली होती. या टायगरवर लाखोंची बोली लागली नसती तर नवलच...कारण त्याच्या रुपापेक्षाही जन्मत:च त्याच्या पाठीवर उमटलेली अल्लाहची खूण. या खुणेमुळेच मर्सिड़ीजलाही लाजवेल एवढ्या किमतीची बोली त्याच्यावर लागलीय. अशी खूण असलेली जनावरं ज्यांच्याकडे असतात त्यांना नशीबवान समजण्याची धारणा आहे. तालुक्याच्या बाजारात टायगरला विक्रीसाठी आणलं होतं. ११ लाखांपासून त्याच्यावर बोली लागली. ही बोली वाढता वाढता थेट ५१ लाखांपर्यंत गेली.