Indapur Crime News: इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूरकडे जाणाऱ्या लेनलगतचे हॉटेल जगदंब येथे दोन दिवसांपुर्वी जी गोळीबारीची घटना घडली होती. या प्रकरणात एकाचा जागीच खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पुणे ग्रामीण पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे.
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजी बाबुराव भेंडेकर, वय ३५ वर्षे, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे,मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे वय २० वर्षे, रा. आंबेडकर चौक, पोलीस चौकी समोर, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे ,सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे वय २० वर्षे, रा. शाळा नं. ४, चन्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे,सोमनाथ विश्वंभर भत्ते, वय २२ वर्षे, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड जि.पुणे यांना पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावचे परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींची शोध सुरू आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूरकडे जाणारे लेनलगतचे हॉटेल जगदंब येथे मयत अविनाश बाळु धनवे हा त्याचे इतर तीन मित्र नामे बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजु एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांच्यासोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून चारही मित्र टेबलवर बसलेले असताना आठ जणांच्या टोळीने हातात पिस्टल, कोयता घेवून हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश धनवे याच्यावर गोळीबार केला. तसंच, कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याचा जागीच खून केला. त्यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले
गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व फिर्यादी यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे हा गुन्हा दोन गुन्हेगार टोळीतील पुर्ववैमन्यसातून झालेला असल्याचे निष्पन्न झाले
याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अविनाश बाळू धनवे याची चन्होली, आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याच्या विरोधी टोळीनेच केला असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या गुन्हयातील आरोपी हे कोल्हापूरकडे पळून जात असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती आणि पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील इतर आरोपींचा शोध चालू आहे.