अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : भारत आणि श्रीलंकेच्या लष्करामध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरु असणाऱ्या युध्द सरावाचा २६ ऑक्टोबरला समारोप झाला. मित्र शक्ती नावाने दोन्ही देशांत गेल्या पाच वर्षांपासून लष्करी सराव केला जात आहे.
एका गावामध्ये अतिरेकी लपल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर, लष्कराची तुकडी त्या ठिकाणी त्वरीत दाखल होते. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन लष्कर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवतं आणि त्यानंतर अतिरेक्यांशी चकमक सुरु होते.
सीमेवर अतिरेकी कारवायांचा लष्कर ज्याप्रमाणे बिमोड करतं अगदी तसाच धुमश्चक्रीचा थरार, पुण्यातल्या औंधमधल्या लष्करी कॅम्पमध्ये अनुभवायला मिळाला. हा युध्द सराव होता भारत आणि श्रीलंकेच्या लष्करी जवानांचा. यात दोन्ही देशांच्या जवानांनी एकत्रितपणे युद्ध कौशल्यांचा सराव केला.
या लष्करी सरावासाठी श्रीलंकेच्या रेजिमेंटचे तब्बल १२० जवान आणि अधिकारी दोन आठवडे पुण्यात डेरेदाखल होते. भारताकडून औंध मिलिटरी कॅम्पमधल्या महार रेजिमेंटच्या जवान या सराव मोहिमेत सहभागी झाले होते.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी शेजारील देशांमध्ये समन्वय आणि मैत्रीपूर्ण संबंध असणं काळाची गरज बनली आहे. त्यातूनच मैत्री शक्ती ही संकल्पना पाच वर्षांपूर्वी अवलंबण्यात आली.