शेतात काम करुन घरी अंघोळीसाठी आला अन्... 23 वर्षाच्या जवानाने संपवली जीवनयात्रा

Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जवानाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. मात्र त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे. 

Updated: Apr 10, 2023, 11:40 AM IST
शेतात काम करुन घरी अंघोळीसाठी आला अन्... 23 वर्षाच्या जवानाने संपवली जीवनयात्रा title=

Kolhapur News : बदली झाल्याने सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैन्यातील (Indian Army) एका जवानाने टोकाचे पाऊल उचललं आहे. जनावरांच्या गोठ्यात गळफास लावत जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. सकाळी आई वडिलांसोबत शेतात काम करुन घरी आल्यानंतर आल्यानंतर जवानाने गोठ्यात गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, जवानाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली आहे.

शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (23) राहणार धनवाडी तालुका गडहिंग्लज असे या जवानाचे नाव आहे. दहावीनंतर शिवानंद आरबोळे सैन्यात भरती झाला होता. याआधी तो मेघालयमध्ये तैनात होता. शिवानंदची राजस्थानमध्ये बदली झाल्याने तिथे जाण्यापूर्वी तो गडहिंग्लजला आपल्या गावी आला होता. शिवानंद अविविहीत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता. शिवानंदसाठी मुलीदेखील पाहिल्या जात होत्या. मात्र त्याआधीच शिवानंदने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

रविवारी शिवानंद त्याच्या आई वडिलांसोबत शेतात काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने शेतातच जेवण केले आणि अंघोळ करण्यासाठी तो घराकडे आला होता. घराच्या पाठीमागे असलेल्या गोठ्यात जाऊन त्याने दरवाजा आतमधून बंद करुन घेतला. त्यानंतर गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेत स्वतःला संपवले. बराच वेळ शिवानंद बाहेर न आल्यामुळे त्याच्या आजीने गोठ्याचा दरवाजा ठोठवायला सुरुवात केली. त्यानंतर आजीने आरडाओरडा करुन आजूबाजूच्या नातेवाईकांना गोळा केले.

नातेवाईकांनी दरवाजा उघडताच त्यांना धक्का बसला. गोठ्यामध्ये शिवानंदने दोरीने गळफास घेतल्याचे दिसताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. नातेवाईकांनी शिवानंदला तात्काळ उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच शिवानंदचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शिवानंदने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शिवानंद याचा मोठा भाऊ देखील सैन्यात असून तो देखील सुट्टीसाठी घरी आला होता. मात्र त्याने घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दुसरीकडे  गडहिंग्लज पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x