मुंबई : इंदूरीकर महाराजांच्या वक्तव्याचा वाद गाजत असतानाच त्यांची आणखी एक क्लिप समोर आली आहे. कीर्तन सुरु असताना इंदूरीकर महाराज शाळेतल्या मुलांना त्यांच्या आई-बाबांबद्दलच प्रश्न विचारत आहेत. त्यामध्ये भामटा कोण? असा प्रश्न विचारला असताना मुलं बाप, असं उत्तर देतात.
इंदूरीकर महाराजांना त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांनी पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत १२ फेब्रुवारीला नोटीस बजावली होती. या नोटिशीला इंदूरीकर महाराजांनी उत्तर दिलं आहे. नोटिशीला उत्तर द्यायचा आजचा शेवटचा दिवस होता.
महाराजांच्यावतीने वकील आणि सेवेकरी यांनी नोटीसचे उत्तर जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडे दिलं. महाराजांनी आपला खुलासा बंद लिफाफ्यात जिल्हा शल्यचिकित्सकाच्या नावाने दिला आहे. त्यामुळे नोटीसच्या उत्तरामध्ये महाराजांनी नेमकं काय म्हटलंय हे कळलेलं नाही.
दरम्यान वक्तव्यावरुन वाद वाढल्यानंतर इंदूरीकर महाराजांनी काल दिलगिरीही व्यक्त केली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, पण भावना दुखावल्या असल्यास आपण मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं इंदुरीकर महाराज यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिलं.
सम तारखेला संभोग केल्यास पुत्र होतो, तर विषम तारखेला केल्यास कन्या होते, असं विधान त्यांनी आपल्या कीर्तनादरम्यान केलं होतं, यावर इंदुरीकर महाराज यांच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती, तर काहींनी थेट कायदेशीर तक्रार दाखल करत, इंदुरीकर महाराज अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता.