स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या महिला गाईडसचं उपोषण सुरू आहे. 

Updated: Jan 9, 2018, 02:40 PM IST
स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर! title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या महिला गाईडसचं उपोषण सुरू आहे. 

चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पट्टेदार वाघांच्या दर्शनासाठीचं हमखास टुरिस्ट डेस्टिनेशन... इथले वन्यजीव आणि निसर्गासाठी वर्षभर लाखो पर्यटक या ताडोबाला भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी प्रकल्पातल्या ६ प्रवेशद्वारांतून सुमारे ९० जिप्सींची व्यवस्था करण्यात आलीय. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळच्या गावांमधल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी स्थानिकांना वनविभागानं गाईड प्रशिक्षण देत गावातच काम दिलंय. गेली अनेक वर्षं हे काम नियमानुसार सुरु आहे. मात्र २०१५ वर्षात पुरुष गाईडच्या बरोबरीला ६ महिलांनी हे काम करण्याचा निर्धार केला. या महिलांचे देशभरातून कौतुक झाले. त्यांना थेट मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करत त्यांचा कामाचा गौरव करण्यात आला. 

पण आता या महिलांबाबत भेदभाव करण्यात येतोय. सुमारे ४० पुरुष गाईडसनी एकत्र येत एक संस्था स्थापन केलीय. त्याचं सदस्यत्व महिलांना दिलेलं नाही... त्यामुळे या महिलांना जिप्सीत बसण्याची आणि रोजगाराची संधी नाकारली जातेय. याविरोधात महिला उपोषणाला बसल्यात. 

चंद्रपूरच्या श्रमिक एल्गार संघटनेने या महिला गाईड्सच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केलाय. या सगळ्या प्रकरणात ताडोबा व्यवस्थापन मौन बाळगतंय. पण आता महिला गाईडसच्या या उपोषणाची दखल व्यवस्थापनाला लवकरात लवकर घ्यावीच लागणार आहे.