मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. पण या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचं रूद्र रूप शांत झालं आहे. पण तरीही नागरिकांना पोलिसांचा त्रास तर होत नाही ना? पोलीस सर्व नियमांचे पालन करत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी IPS अधिकारी कृष्णप्रकाश चक्क 'मटणवाले चाचा' यांचं रुप धारण केलं.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या स्टाईलकरता चर्चेत असतात. त्याचीच प्रचित पुन्हा एकदा झाली आहे. यावेळेस ते थेट वेशांतर करून पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचले. पोलीस नागरिकांशी सौजन्याने वागतात का? हे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तपासले आहे. यामध्ये काही पोलीस पास झाले तर काही पोलीस नापास झाले. आपण देखील ओळखूही शकत नाही असा अवतार करून कृष्णप्रकाश पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.
बुधवारी मध्यरात्री १२ वाजता IPS कृष्णप्रकाश यांनी वेशांतर केले. एका मुस्लिम व्यक्तीच्या वेशात ते पिंपरी शहरात वावरले. यावेळी त्यांनी 'मटणवाले चाचा' दिसतील असे कपडे-गोल टोपी घातली आणि दाढी-केस लावले. कोणती शंका येऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांना चाचीची भूमिका त्यांनी दिली. रात्री बाराच्या ठोक्याला खाजगी वाहनातून ते बाहेर पडले.
यावेळी त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली असून ते तीन पोलीस स्टेशनमध्ये गेले. पिंपरी, वाकड आणि हिंजवटी पोलीस स्टेशनमध्ये आणि जिथे नाकाबंदी लावण्यात आली आहे तिथे कृष्णप्रकाश गेले. काही ठिकाणी जावून त्यांनी पाहणी केली. यावेळेस हिंजवटी आणि वाकड पोलीस स्टेशनमधील पोलिसांचा व्यवहार त्यांना योग्य वाटला. पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये असे काही चित्र दिसून आले नाही. त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये सांगितले की, एका ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज आहे, पण चालक अधिकचे पैसे मागतोय. यावेळेस पिंपरी पोलिसांनी हवी ती मदत केली नाही.
दरम्यान पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आदेश काढला होता की, जे अधिकचे पैसे मागतील त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जावे. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी तातडीने त्या रुग्णवाहिका चालकावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु तशाप्रकारची कारवाई केली गेली नाही. तसेच जिथे नाकाबंदी आहे, तिथे कोण कुठे जातंय हे चेकं करणे आवश्यक असते. पण एका नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस मोबाईलवर गेम खेळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कृष्णप्रकाश यांच्या परिक्षेत काही पोलीस पास झाले तर काही पोलीस नापास झाले आहेत. त्यामुळे आता जे नापास झाले आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.