मुलांनेच केला आईच्या मैत्रिणीचा खून

सात महिन्यात तीन खून, डेव्हिड गँगची इगतपुरी शहरात दहशत 

Updated: Aug 21, 2022, 02:59 PM IST
मुलांनेच केला आईच्या मैत्रिणीचा खून  title=
खून करण्यात आलेली महिला झकिया शेख

सोनू भिडे, नाशिक:  

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील  इगतपुरी गावात शुक्रवारी पहाटे (१९ ऑगस्ट) चॉपर खुपसून एका महिलेचा खून करण्यात आला आहे. २१ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत आईच्या मैत्रिणीचा खून (Murder) केल्याच म्हटलं जात आहे. झकीया शेख महेमूद असे खून झालेल्या महिलेचे नाव असून इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी छोटा पापा उर्फ जॉन पॅट्रीक मॅनवेल हा डेव्हिड गँगचा म्होरक्या असल्याच म्हटलं जात आहे.

इगतपुरी (Igatpuri) शहरात गेल्या सात महिन्यात तीन खून झालेत. यामुळे शहर आधीच दहशतीत आहे. त्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या खुनाने इगतपुरी शहर हादरले आहे.

असा झाला खून

झकीया शेख महेमूद आणि संशयित आरोपीचे कुटुंब इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथे राहतात. झकीया शेख या धुणे भांड्याचे काम करून कुटुंब चालवत असत. झकीया शेख यांचे संशयित आरोपीच्या कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होते.

गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपी व आरोपीच्या आई मध्ये वाद विवाद सुरू होते. आरोपी आणि त्याच्या आईच्या भांडणाचा आवाज संपूर्ण गायकवाड नगर मध्ये येत होता. झकीया शेख यांचे संशयित आरोपीच्या कुटुंबियांशी घरगुती संबंध असल्याने परिसरातील काही महिलांनी त्यांना भांडण मिटविण्याची विनंती केली. यानंतर झकीया शेख भांडण सोडवण्यासाठी आरोपीच्या घरी  गेले असता दारूच्या नशेत असलेला संशयित आरोपी पापा उर्फ जॉन पॅट्रीक मॅनवेल याने झकीया शेख यांच्या छातीत चॉपर खुपसला. हल्ल्यात झकिया शेख गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुख्य संशयित आरोपी फरार

हत्येत एकूण सात संशयित आरोपी सहभागी असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांनी दिली. छोटा पापा उर्फ जॉन पॅट्रीक मॅनवेल, आदिल इस्माईल पठाण, फरहान खुर्शिद बेग, सनी रमेश पगारे, गुलाब मोहम्मद शेख, आशा पॅट्रीक मॅनवेल, श्रध्दा सायमन मॅनवेल (सर्व रा. गायकवाड नगर, इगतपुरी) अशी संशयित आरोपींची नाव आहेत. इगतपुरी पोलिसांनी या सात आरोपींपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून इतर संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.