प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरात एक अजब घटना घडली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर (Kolhapur Collector Rahul Rekhawar) यांच्यावर खुर्ची गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने (Jaisingpur Civil Court) हा निर्णय दिला आहे.
जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने तक्रारदाराला देण्यात येणारा मोबदला द्यायला टाळाटाळ केल्याने रेखावर यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची खुर्ची, वाहन, ऑफिस मधील कम्प्युटर, फॅन आणि कुलर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाप्रमाणे दिवाणी न्यायालयाचे बिलिफ आणि संबंधित तक्रारदार जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आहेत. एक प्रकारे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे असं म्हणता येईल. 1983 साली रस्त्याकरीता संपादित केलेला जमिनीचा मोबदला द्यायला विलंब केला म्हणून जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
तीन महिन्याच्या आत रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा असा आदेश न्यायालयाने दिला होता. यानंतरही जिल्हाधिकाऱ्यानी अंमलबजावणी केली नाही म्हणून कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना फटकारलं आहे. वसंत राजाराम संकपाळ असं तक्रारदार यांचे नाव आहे.
1984 पासून संकपाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या जिझवत आहेत. इतकचं नव्हे तर जयसिंगपुर दिवाणी न्यायालयाने 2019 ला आदेश देवून देखील जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार याला न्याय दिला नाही, म्हणून कोर्टाने जिल्हाधिकारी यांना चांगलं फटकारले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीची कारवाई एका दिवसासाठी टळली आहे. जयसिंगपूर मधील दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला मिळाला स्टे दिला आहे.