'नागवेलींचे पानमळे' नामशेष होण्याच्या मार्गावर

नागवेलींपासून पानांचं उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत

Updated: Dec 6, 2019, 03:47 PM IST
'नागवेलींचे पानमळे' नामशेष होण्याच्या मार्गावर title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरण्यात येतात त्यांना 'नागवेल' असंही म्हटल्या जातं. कमी होत चाललेला पाणीसाठा, पीकविमा योजनेचं नसलेलं कवच आणि वातावरणात सतत बदल होत असल्यानं नागवेलींपासून पानांचं उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

'खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला', या डॉन चित्रपटातील गाण्यानं नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहचवली. 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' या बहारदार लावणीनं त्यात आणखी रंगत आणली. मराठी ,हिंदी चित्रपटातील गाण्यातून आणि लावण्यांमधून नागवेलींच्या पानात अक्षरशः गोडवा आणला. पण अगदी पुरातन काळापासून महत्व असलेल्या नागवेलींच्या पानाचे मळे आजघडीला सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजतायत. जालना जिल्ह्यातील भारज गावात 10 वर्षांपूर्वी पानाचे शेकडो मळे अस्तित्वात होते. पण वातावरणात बदल झाला.पावसाचं प्रमाण कमी झालं. गारपिटीचा फटका बसू लागला.आणि अशा परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं आजघडीला भारज गावात फक्त 50 ते 60 पानमळे शिल्लक राहिले आहेत.

नागवेलीच्या पानाचा मळा उभा करण्यासाठी अथक कष्ट घ्यावे लागतात. वेलींची लागवड करण्याआधी उंच वाढणाऱ्या शेवगा झाडाची लागवड करावी लागते. नंतर पानाच्या वेली लावाव्या लागतात.नंतर नागवेल या झाडांवर चढवली जाते. कमी पाण्यात वेली वाढण्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर हमखास करावा लागतो.तारेच्या कंपाऊंड बरोबरच पानवेलींना वादळाचा फटका बसू नये म्हणून जाळ्या देखील लावाव्या लागतात. 

अगदी पहिलं उत्पन्न हातात येईपर्यंत लाखोंचा खर्च होतो.पण गारपीट,वादळीवारा,दुष्काळ,अतिवृष्टी आणि आणखी काही कारणांनी मळयाला धोका पोहचला की शेतकरी अडचणीत सापडतो.कारण लाखमोलाचं महत्व असलेल्या पानमळ्यांना कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण नाही. शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही या शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही दुर्लक्षीत आहे. पण राज्य सरकारचा महसूल विभाग या पानमळा उत्पादक शेतकऱ्यांकडून सक्तीने करवसुली करतो.

देखील पानाला अनन्य साधारण महत्व आहे. पान खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी कॅल्शियम, प्रोटीन्स,खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मिळतं. अनेकदा पान खाणं ही वाईट सवय समजली जाते. कारण अनेक लोकं व्यसन म्हणून पान खातात. त्यामध्ये शरीराला हानिकारक अशा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. असे केल्याने पानामधील शरीराला आवश्यक असणारी सर्व तत्व नष्ट होतात. त्यामुळे असे न करता त्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून खाणं फायदेशीर ठरतं. पान खाल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये लागलेली किड, भूक वाढवणं त्याचप्रमाणे पचन क्रियादेखील सुरळीत होण्यास मदत होते. असा अभ्यासू शेतकरी आणि डॉक्टरांचा दावा आहे.

पानमळयांची संख्या कमी झाल्यानं साहजिकच त्याचा परीणाम एकूण उत्पादनाबरोबरच पान टपरी चालकांच्या व्यवसायावर देखील झाल्याचं पाहायला मिळतं. आजही पान खाणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. पण बाजारपेठेत मागणी एवढे पान विकत मिळत नसल्यानं पानटपरी चालक हैराण झालेत.

शेतकऱ्यांना सर्वात जास्त ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत,ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर अधिक भर असेल असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे वर्षानुवर्षे अन्याय सहन करत असलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्याय द्यावा अशीच या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.