पत्नीला खुश ठेवण्यासाठी करायचा जुगाड, पण झाला गजाआड

प्रेयसीशी लग्न केलं खरं, पण तिचे लाड पुरवण्यासाठी त्याच्याकडे पैसेच नव्हते, मग त्याने केलं असं काही...

Updated: Apr 29, 2022, 07:00 PM IST
पत्नीला खुश ठेवण्यासाठी करायचा जुगाड, पण झाला गजाआड title=

जालना : प्रेयसीसोबत लग्न झाल्यानंतर तिला खुश ठेवण्यासाठी एटीएम बाहेर तासनतास उभं राहून भोळा-भाबड्या माणसांना गंडा घालणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी गजाआड केलं आहे. जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी या भामट्याला अटक केली असून शैलेश शिंदे असं त्याचं नाव आहे.

मुळचा लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे राहणाऱ्या शैलेशचे आई वडिल मोलमजूरी करतात. कामानिमित्त नाशिकला गेलेल्या आई-वडिलांबरोबर शैलेशही नाशिकमध्ये गेला. तिथे त्याची मैत्री एका मुलीशी झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण शैलेशच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. 

घरच्यांचा विरोध झुगारुन शैलेशने त्या मुलीशी लग्न केलं. पण घर चालवण्यासाठी पैसे नव्हते, त्यातच बायकोकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी डिमांड वाढू लगाली. बायकोला खुश ठेवण्यासाठी मग शैलेशने जुगाड करण्याचं ठरवलं. वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन तो एटीएमबाहेर तासनतास उभा रहायचा. 

एटीएममधून पैसे काढण्याची माहिती नसलेल्या लोकांना तो हेरायचा. त्यांना पैसे काढून देतो असं सांगू त्यांचा पासवर्ड घ्यायचा आणि चलाखीने दुसरच एटीएम त्या वक्तीला द्यायचा. तो व्यक्ती निघून गेल्यावर शैलेश त्याचं अकाऊंट रिकामं करायचा. जालन्यात अशा  4 ते 5 घटना घडल्यावर पोलिसांनी सापळा रचला.

अखेर पोलिसांच्या जाळ्यात शैलेश सापडला आणि पोलिसांनी त्याला गजाआड केलं.