जालना : श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ घालण्याचा प्रयत्न झालाय. गेल्या महिन्यात शिवडीला होत असलेला भिडे यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा जालना येथे याची पुनरावृत्ती झाली आहे. जालना शहरात आज शिवप्रतिष्ठानच्या वतीने संभाजी भिडेंच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्याख्यानात गडकोट मोहिमेसंदर्भात भिडे गुरुजी मार्गदर्शन करणार होते. भिडेंचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच भारीपसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन भिडे गुरुजींच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यक्रमाला विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी भारीपसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला.
शहरातील रुपम हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भारीपसह आंबेडकरवादी संघटनांचा विरोध होता.
संभाजी भिडे यांच्या मुंबईतील कार्यक्रमात दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. शिवडी परिसरात 16 डिसेंबरला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी करून कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये अनेक महिला कार्यकर्त्याही होत्या. त्यांनी संभाजी भिडे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या सगळ्या प्रकारानंतर संभाजी भिडे येथून निघून गेले.