आणखी एक राजकीय हत्या; भाजप नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू

Mahendra More Died : जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आठवडाभरातील ही तिसरी राजकीय गोळीबाराची घटना असून या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 10, 2024, 09:15 AM IST
आणखी एक राजकीय हत्या; भाजप नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू title=

Jalgaon Crime : गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांनी हादरला आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या गोळीबारात जबर जखमी झालेल्या महेंद्र मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. दरम्यान ही हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत.

चाळीसगाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.  महेंद्र मोरे यांच्यावर सुरुवातीला चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचराचांना साथ देत नसल्याने त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असताना महेंद्र मोरे यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मोरेंवर  गोळीबार करणाऱ्या सात जणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलीस प्रशासनाने यासाठी तीन विशेष पथके तैनात केली असल्याची माहिती समोर आली आहे.

कसा झाला हल्ला?

बुधवारी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्याचवेळी पाच अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात पिस्तूल घेऊन आले होते. कारमधून उतरताच ते महेंद्र मोरे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. ही घटना पूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी आरोपी एका कारमधून कसे उतरतात, हातात बंदुका घेऊन कशा प्रकारे माजी नगरसेवकाच्या कार्यालयात शिरतात हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका पाठोपाठ एक असे पाच जण हातात बंदुका घेऊन आले आणि थेट मोरे यांच्या कार्यालयात घुसले. मोरेंवर गोळीबार करताच आरोपींनी तेथून धूम ठोकली. या गोळीबारात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.