6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या, जामनेरमध्ये उद्रेक... पोलिसांवरच हल्ला

Jamner : अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या, म्हणत संतप्त जमावानं पोलीस स्टेशनवर दगडफेक केलीय. न्यायालयानं आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. जामनेर पोलीस स्टेशनबाहेर जमावाचा उद्रेक झाला.

राजीव कासले | Updated: Jun 21, 2024, 07:49 PM IST
6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या,  जामनेरमध्ये उद्रेक... पोलिसांवरच हल्ला title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव  :  जळगावच्या जामनेरमधली (Jamner) पोलीस स्टेशनबाहेर जमावाचा उद्रेक पाहायला मिळाला. जमावाने अचानक दगडफेक केली. धक्कादायक म्हणजे जमावाला पांगवत असताना एका अज्ञात इसमाने एका पोलिसाच्या डोक्यावरच प्रहार केला. हे कमी की काय संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांवरच आपला जीव वाचवण्याची वेळ आली. संतप्त जमाव यावरच थांबला नाही त्यांनी जाळपोळही केली. रस्त्यावर टायर पेटवले. 

जळगावमध्ये काय घडलं?
जळगावच्या जामनेरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. या घटनेनं कोणताही सामान्य माणूस चिडून पेटून उठेल.. एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तीची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. आरोपी सुभाष सोनवणे त्यानंतर फरार झाला. 15 दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला भुसावळमधून ताब्यात घेतलं आणि इथूनच सुरु झाला जमावाचा उद्रेक. आरोपीला अटक (Accused Arrest) केल्याची माहिती मिळताच नागरिक पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले.. रास्ता रोको सुरु झाला. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानंतर मात्र जमाव संतापला.. 

संतप्त जमावानं पोलिसांवरच दगडफेक सुरू केली..पोलीस स्टेशनच्या काच्या फुटल्या. अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. संतप्त जमावानं एका पत्रकाराची दुचाकीही जाळली. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

आरोपीला पकडण्यासाठी 10 दिवस का लागले, असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात केलाय. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी जामनेरच्या घटनेवरून गिरीश महाजन यांना टार्गेट करत सवाल उपस्थित केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर तपास प्रकरणातील पोलिसाच्या प्रतिक्रियेचा दाखला देत थेट सरकारवरच गंभीर आरोप केलाय. यावर लोकांनी संतापातून कृत्य केलं असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय. 

चिमुरडीच्या हत्येनंतर तीच्या वडिलांनी आरोपीवर संशय व्यक्त करत पोलिसांकडे फिर्याद नोंदवली होती. तरीही आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांना 10 दिवस लागले. यावरुनच स्थानिक नागरिक संतापले होते. त्यामुळेच जामनेरमध्ये उद्रेक पाहायला मिळाला.