नितेश महाजन, झी २४ तास, जालना : राज्य सरकारने तारखांचे आकडे न खेळता किमान संपूर्ण पीककर्ज माफ करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. जालना तालुक्यातील वाघरूळ जहागीर गावच्या प्रकाश खरात यांनी २०१७ मध्ये 'बँक ऑफ महाराष्ट्र'चं दीड लाखांचं पीक कर्ज काढलं. नंतर त्याचं पुनर्गठन केलं. पण मुद्दल आणि व्याजासह थकबाकीची रक्कम सप्टेंबर अखेर २ लाखांच्या वर गेलीय. त्यामुळे आता त्यांना सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीआधी सातबारा संपूर्ण कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. ते त्यांनी पाळावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
अशीच अवस्था याच गावातल्या उत्तम खरात यांचीही... त्यांनीही बँकेकडून २०१७ मध्ये कर्ज काढलं. आता मुद्दल आणि व्याजाची रक्कम २ लाखांच्यावर गेलीय. कर्जमाफीला कोणतीही अट नसावी अशी मागणी त्यांनी केलीय.
यावर्षी शेतकरी परतीच्या पावसामुळे बेजार झाले. त्याचीही भरपाई मिळालेली नाही. या अवस्थेत शेतकऱ्यांना सरकारची साथ गरजेची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा राज्य सरकारने विचार करावा अशी मागणी केली जातेय.