मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची आज शिफारस केली आहे. म्हणून आता देशाच्या सरन्यायाधीशपदी आता पुन्हा एकदा मराठी माणूस विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भावी सरन्यायाधीश असलेले न्यायमूर्ती लळीत हे मूळचे कोकणातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये हे त्यांचे मूळ गाव. दरम्यान सध्या न्यायमूर्ती लळीत यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यातील आपटा इथे स्थायिक झाले आहे.
मराठीत शिकलेल्या न्यायमूर्ती लळीत यांची अभिमानास्पद कारकीर्द
न्यायमूर्ती उदय लळीत यांचा जन्म मुंबईतील आंग्रेवाडी इथे झाला. त्यांनी शिरोडकर हायस्कूलमधून मराठी माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम मुंबईतील ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे काही वर्षे सहायक म्हणून काम केले. नंतर ते दिल्लीत गेले आणि सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत होते. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. त्यांनी देशभर असंख्य महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकिली कौशल्याचा ठसा उमटविला होता. देशभरातील बहुतांश राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद केले आहेत. एकूण 14 राज्यांच्यावतीने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कसे लढवल्या आहेत. स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या विशेष अधिकारांतर्गत न्या. उदय उमेश लळीत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती.
न्यायमूर्ती लळीत यांना वकील व्यवसायाचा वारसा
न्यायमूर्ती लळीत यांना यांना कायद्याचं ज्ञान किंवा बाळकडू हे अगदी लहानपणापासून मिळाले. कारण त्यांचे आजोबा ऍड. धोंडोदेव लळीत हे वकील होते. तर त्यांचे वडील अॅड. उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील होते. 1974 ते 1976 या काळात त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.