आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : ठाणे जिल्ह्यातील (Thane) टिटवाळा (Titwala) इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका नोकराने आपल्या मालकाची निर्घृण हत्या (Murder) केली. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर नोकराने मालकाच्या मृतदेह जमिनीत पुरला. कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्यावर मेलेल्या म्हशीचा मृतदेह टाकला. मात्र दोन दिवसांनंतर मृतदेहचा हात बाहेर आला आणि या क्रूर हत्येचा उलगडा झाला.
सचिन माम्हाने असे मृत मालकाचं नाव असून या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी (Titwala Police) सुनील मौर्या या नोकरासह त्याचे साथीदार शुभम गुप्ता आणि अभिषेक मिश्रा यांना बेड्या ठोकल्यात. सचिन म्हामाने यांचे टिटवाळा परिसरात इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचं दुकान आहे. 7 एप्रिलला सचिन कामानिमित्त बाहेर गेला, पण घरी परतलाच नाही. त्यामुळे सचिनच्या कुटूंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
मालकाच्या हत्येचं कारण?
सचिन माम्हाने यांची पत्नी अधून-मधून दुकानात येत असे. आरोपी सुनील मौर्या हा पत्नीकडे वाईट नजरेने बघतो असा संशय सचिनला होता. त्यामुळे तो त्याला काम करताना ओरडायचा आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा. मालकाच्या या सततच्या धमक्यांना आरोपी सुनील मौर्या वैतागला होता. शेवटी त्याने साथीदारांच्या मदतीने सचिनचा काटा काढायचं ठरवलं. यासाठी त्यांनी दहागांव भागात एका फार्म हाऊसमध्ये इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिक काम असल्याचा बहाणा करत सचिनला आपल्या सोबत नेलं.
तिथे एका निर्जळ स्थळी आरोपींनी सचिनची गळा दाबून हत्या केली. मृतदेह कोणाला दिसू नये यासाठी त्यांनी एक खड्डा केला आणि त्यात सचिनचा मृतदेह पुराला. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून त्यावर पाला पाचोळा टाकण्यात आला आणि एका मेलेल्या म्हशीचा मृतदेह टाकला. पण दोन दिवसांतच हत्येचा भांडाफोड झाला.
जळालेल्या मृतदेहाने खळबळ
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गडेगाव लाकूड डेपोजवळील जंगलात अनोळखी इसमाचे प्रेत जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. आरोपीने त्याला जाळून ठार केल्याची माहीती पोलीसांनी दिली असून जवळपास 8 ते 10 दिवसांपूर्वीची ही घटना असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरनी अज्ञात आरोपीवर खूनाचा गून्हा दाखल केला असून घटनेच्या पुढील तपास साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी करित आहे..