नितेश राणेंना धक्का; संदेश पारकरांचा सतीश सावंतांना पाठिंबा

सतीश सावंतच महायुतीचे अधिकृत उमेदवार 

Updated: Oct 7, 2019, 02:29 PM IST
नितेश राणेंना धक्का; संदेश पारकरांचा सतीश सावंतांना पाठिंबा title=

मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असतानाच आता सर्वत्र राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. याच सत्रात कणकवलीत नितेश राणे यांना जबर धक्का बसल्याचं कळत आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी माघार घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा दिला आहे. 

मुख्य म्हणजे सतीश सावंत हेच खरे महायुतीचे उमेदवार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार नसल्यानं सतीश सावंतांच्या पाठिशी राहणार असल्याची भूमिका संदेश पारकर यांनी व्यक्त केली. 

पारकर यांची ही भूमिका पाहता खासदार विनायक राऊत यांच्या शिष्टाईला यश आलं आहे. एकिकडे भाजपने राणेंना उमेदवारी दिली असली तरीही दुसरीकडे मात्र शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना असाच संघर्ष कणकवलीत पाहायला मिळणार आहे. 

त्याशिवाय शिवसेना विरुद्ध भाजपामधील थेट सामना यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव असला तरी राज्यातील इतर कोणत्याही मतदारसंघांमध्ये हे दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकमेकांविरोधात उभे ठाकलेले नाहीत. तेव्हा आता कणकवली मतदारसंघाची लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे.