सातारा : केंद्र व राज्य शासन जल सिंचनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णा नदीवरील खोडशी धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित काम गेली ३३ वर्षे पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे कोट्यवधी रुपयेचा खर्च पाण्यात गेला असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे शासनाचा २१ कोटी रुपयेचा खर्च पाण्यात गेला आहे.
महाबळेश्वर ते अलमट्टी धरण असा २१० किलोमीटरचा प्रवास कृष्णा नदी करते. याच कृष्णा नदीनं लाखो एकर जमीन ओलिताखाली आलीय. जलसिंचनासाठी कृष्णा नदीवर १८६४ मध्ये इंग्रजांनी कराड तालुक्यातल्या खोडशी इथं बंधारा बांधला होता.
त्यानंतर १९७९ मध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी बंधा-याच्या कामासाठी २ कोटी २३ लाखांची मंजुरी दिली आणि भूमिपूजन देखील केलं. मात्र पुरेशा निधीअभावी बंधाऱ्याचं काम आजतागायत रखडलंय
या बंधाऱ्यामुळे खोडशी, सैदापूर, वहागाव, नडशी, शिरवडे, तासवडे, बेलवडे, घोणशी, कोपर्डे हवेली यासारख्या २० गावांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याचा उपयोग होणार आहे. मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे तीन वेळा भूमिपूजन होऊनही प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेतच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काही प्रमाणात निधी दिला. परंतु हा प्रकल्प काही पूर्ण होऊ शकला नाही.
खोडशी बंधाऱ्यासाठी आत्तापर्यंत २१ कोटी ५६ लाख रुपये खर्च झालाय. आघाडी सरकारनं तीन वेळा निधी देण्याचा प्रयत्न केला मात्र निधी पुरेसा नसल्यानं काम अर्धवट झालं. १७ दरवाज्यांपैकी अजूनही ७ दरवाजे बसवणं बाकी आहे. दरम्यानच्या काळात तीन कंत्राटदारही बदलले गेले.
जलसंपदा विभागानं उर्वरित कामासाठी एकूण २७ कोटी ९३ लाखांचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवल्याचं अधिकाऱ्यांनी झी २४ तासला सांगितलं. खोडशी धरणाचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत. ३३ वर्षांनंतर तरी रखडलेला प्रकल्प पूर्ण होणार का? आणि त्यातून गावकऱ्यांना दिलासा मिळणार का हाच खरा प्रश्न आहे.