प्रणव पोळेकर झी मीडिया, रत्नागिरी : यंदा पावसाळा लांबला आणि त्यामुळे हिवाळाही उशीरा सुरू झाला. मात्र यामुळे कोकणातील आंबा उत्पादक हतबल झाले आहेत. कोकणातल्या हापूस आंब्याच्या अवस्थेला वातावरणातील बदल कारणीभूत ठरतो आहे. दोन दिवस थंडी आणि त्यानंतर कडक ऊन असे काहीसे बदल सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पाहायाला मिळत आहेत. त्याचा परिणाम हापूस आंब्यावर होतो आहे. त्यामुळे आंबा उत्पादक हतबल झालेत.
यंदा डिसेंबर पर्यत पाऊस झाला त्यामुळे मोहोर येण्याच्या काळात झाडाला पालवी आली. परिणामी, मोहोर उशिरा आला. त्यानंतर देखील फळ धारणा चांगली होईल अशी अपेक्षा होती. मात्र तिथेही निसर्गाचा लहरीपणा आडवा आला. थंडी आणि ऊन यांच्या खेळात आंब्यावर तुडतुडी, उंटअळी आणि थ्रिप्स सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला.
या साऱ्या संकटातून आता सावरायचं कसं? असा प्रश्न आता सामान्य आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना पडलाय. २०१४-१५ साली बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा जीआर काढला. ही रक्कम जवळपास २०० कोटींच्या जवळ आहे. पण, प्रत्यक्षात मात्र कर्जदारांच्या हाती काहीच लागलं नाही. शिवाय, पिक विमा काढून फायदा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
कोकणातल्या आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांना देखील सध्या मोठ्या प्रमाणावर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो आहे. त्यामुळे किमान सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि बळीराजाला उभारण्यास हात द्यावा हीच अपेक्षा आहे.