धक्कादायक, शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर

शरीर सौष्ठव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर केल्याचे उघड झाले आहे.  

Updated: Feb 13, 2020, 06:18 PM IST
धक्कादायक, शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर title=
संग्रहित छाया

कपील राऊत, ठाणे : शरीर सौष्ठव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर केल्याचे उघड झाले आहे. घोड्यांकरिता वापरली जाणारी स्टेरॉइड्स ऑनलाइन वेबसाइटमार्फत उपलब्ध होत असल्याने या हॉर्सपॉवरचा वापर पीळदार शरीरयष्टीकरिता करण्याचा प्रकार तरुणांमध्ये होत असल्याचे उघड झाले आहे.. याचा दुष्परीणाम होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. मात्र तरी आजही अनेक तरुण अशा औषधांच्या विळख्यात अडकलेत. 

शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळाला, तर व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळेल, असे प्रलोभन मुंब्र्यातील या तरुणाला व्यायाम शाळा मालकाने दाखवले. त्यामुळे ओला-उबेर टॅक्सी चालवणाऱ्या या तरुणाला शरीर कमावण्याचे वेड लागले. शरीर पिळदार बनवण्यासाठी तो स्टेरॉईड घेऊ लागला.

घोड्यांचे स्नायू बळकट करण्याकरिता किंवा प्राण्यांच्या शरीरातील मांस वाढवण्याकरिता वापरली जाणारी इंजेक्शन तो घेऊ लागला. या स्टेरॉइडमुळे त्याच्या शरीरावर परिणाम झाला. आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. खोपटच्या हंसनगर परिसरात रहाणाऱ्या २२ वर्षीय मेघनाच्या बाबतीतही असंच घडले. शरीरसौष्ठव क्रीडाप्रकारातील राष्ट्रीय  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण येथील एका जिममध्ये तिचा नियमित सराव सुरु होता. सरावादरम्यान  तिने कुठल्याशा गोळ्या खाल्ल्या आणि त्यात तिचा जीव गेला, अशी माहिती नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

या तरुणांकडे सापडलेली स्टेरॉइड्स कोणत्याही प्रिस्क्रिप्शनविना बाजारात सहज उपलब्ध होतात. तसेच अनेक ऑनलाईन साईट्सवर ऑफर्सचे आमिष दाखवून त्यांची विक्री होते. कमी वेळात पिळदार शरीर बनवण्यासाठी तरुण सऱ्हास याचा वापर करतात. अनेकांना या औषधांच्या दुष्परिणामांची पुसटशी कल्पनाही नसते, अशी माहिती मनोस्पचारतज्ज्ञ शैलेश उमाठे यांनी दिली.

पिळदार शरिर कमावण्यासाठी डाएट ऐवजी अशा औषधांचा चुकीच्या पद्धतीने आधार घेतला जातो. त्यामुळे जीम ट्रेनर्सनीही अशा तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असेही डॉक्टर सांगतात. 

हल्ली गल्लोगल्लीत व्यायामशाळा, जीम, फीटनेस सेंटर्स सुरु झालेत. या बंद कसरतखान्यांमध्ये जाऊन अनेक तरुण पीळदार शरीर बनवण्याचे स्वप्न बघतात आणि स्टेरॉइजच्या विळख्यात अडकतात. त्यामुळे पिळदार शरीरा ऐवजी सुद्रृड शरीराचं स्वप्न उराशी बाळगा असे सांगायची वेळ आता तरुणांवर आली आहे.