पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.
पुणे सत्र न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालायतही एकबोटेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्यापासून एकबोटे अज्ञात स्थळी आहेत.
त्यांना पकडण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसही फारसे सक्रीय नव्हते. असं असताना एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला; आणि आता तो फेटाळण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांचा शोध घेणं क्रमप्राप्त ठरलंय.
त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी एकबोटेंच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चौकशी सुरु केलीय. त्यासाठी आज पुण्यातील सुमारे ५० जणांना हवेली पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्या सगळ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.
जबाब घेण्यात आलेल्यांमध्ये काहींचा अगदीच योगा योगाने किंवा अपवादानं एकबोटेंशी, तोदेखील कधी काळी संपर्क आला होता. अशांनाही पोलिसांनी पाचारण केल्यानं त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान एकबोटे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. तोच एक मार्ग त्यांच्यासमोर उरलाय. त्याचवेळी पोलिसांनी त्यांचा शोध सुरु ठेवल्यास त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.