जळगाव : जिल्ह्यात सध्या तापमान ४५ डिग्री अंश सेल्सियसवर गेलं असून त्याचा मोठा ताण अत्यावश्यक सेवा समजल्या जाणाऱ्या रक्तपेढ्यांवर पडतोय. वाढत्या तापमानामुळं ब्लड डोनर्सकडून होणारं रक्ताचं दान अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी सध्या वणवण भटकावं लागतंय.
जळगाव शहरात जिल्हा सरकारी रुग्णालय, पालिकेची रुग्णालये त्यासोबतच मोठ्या प्रमाणखासगी रुग्णालयांची संख्या आहे. त्यामुळं या हॉस्पिटल्समध्ये रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. ऑपरेशन थिएटर, अचानक घडलेला अपघात किंवा एखाद्या रुग्णाला तातडीनं रक्ताची आवश्यकता भासल्यास जवळच्या रक्तपेढीत संपर्क करून रक्तपुरवठा केला जातो. सध्या मात्र रक्ताचा पुरवठा होताना मोठ्या अडचणी येत असल्याचं रक्तपेढीचालकांचं म्हणणं आहे. वाढतं तापमान याला मुख्य कारण ठरलंय.
दरम्यान, असं सांगितलं जातंय की, एखाद्या रुग्णाला तातडीनं रक्तपुरवठ्याची गरज भासत असते. त्यामुळं अनेक रक्तपेढ्या चालकांकडे त्या त्या रक्तगटाच्या डोनर्सची यादी तयार असते. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांवर रक्तासाठी भटकण्याची वेळ येतेय. बऱ्याचदा नाईलाज असल्यानं थेट रक्तदात्यादात्याशी संपर्क करून रक्तपुरवठा उपलब्ध करून घेतला जातो.
उन्हाळ्यात रक्तदान केल्यानं शारीरिक त्रास होतो हे रक्ताच्या तुटवड्यामागील प्रमुख कारण असलं तरी असा कोणताही त्रास उन्हात रक्तदानाने केल्याने होत नाही. त्यामुळं रक्तदान करा आणि इतरांना जीवदान द्या असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येतंय.