भीषण पाणीटंचाईमुळे राज्यावर मोठे वीज संकट

  चंद्रपूर महापालिकेने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे काही संच बंद करण्याची विनंती केलीय. तसं झाल्यास राज्यात मोठं वीज संकट उद्धभवणार आहे.

Updated: Aug 24, 2017, 11:54 PM IST
भीषण पाणीटंचाईमुळे राज्यावर मोठे वीज संकट  title=

चंद्रपूर : पाऊस कमी झाल्याने यंदा चंद्रपूर शहरात भीषण पाणीटंचाई उद्धभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी महापालिकेने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे काही संच बंद करण्याची विनंती केलीय. तसं झाल्यास राज्यात मोठं वीज संकट उद्धभवणार आहे.

पावसाळ्याचे ३ महिने संपत आले तरी चंद्रपुरात पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे. २४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात अवघा ५२७ मिली मीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या केवळ ३७.७ टक्के इतकाच पाऊस पडलाय. अपुऱ्या पावसामुळे साडे तीन लाख लोकसंख्येच्या शहराला पुढच्या पावसापर्यंत पाणीपुरवठा कसा करायचा, असा यक्षप्रश्न उभा राहिलाय. चंद्रपूर शहराला ज्या इरई धरणातून पाणी पुरवठा होतो, त्या धरणात सध्या फक्त ५० दशलक्षघन मीटर म्हणजे जेमतेम ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणारं इरई धरण चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या मालकीचे आहे. इथं २ हजार ९२० मेगावॅट वीजनिर्मिती होते. आता वीजनिर्मिती की पिण्याचे पाणी असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. चंद्रपूर महापालिकेनं पिण्याच्या पाण्यासाठी महाऔष्णिक वीज केंद्राचे काही संच बंद करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. शिवाय एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचाही पालिकेचा विचार आहे.

 पावसाचा अंदाज पाहता येणाऱ्या काही दिवसात जिल्ह्याची पावसाची सरासरी भरून निघण्याची शक्यता फारच कमी आहे. परिणामी यंदा चंद्रपूरचं लातूर होण्याची भीती व्यक्त केली जाते. चंद्रपूरची पाण्याची तहान भागविण्यासाठी वीजनिर्मितीवर पाणी सोडावं लागणार आहे. तसे झाल्यास राज्यावर वीजसंकट कोसळणार आहे.