शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पावसाअभावी दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागले आहे. इतर सर्वच तालुक्यांसह औसा तालुक्यात दुष्काळाची मोठी झळ सर्वानाच बसत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे अनेकांनी पेरण्याच केल्या नाहीत. तर ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांचे पीक वाया जात आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात तर पेरणी सुद्धा झाली नसल्याने शेतकरी-शेतमजुरांना कसलेही उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी करीत औसा तहसील कार्यालयापुढे चटणी भाकरी आंदोलन करण्यात आले.
दुष्काळ संघर्ष समितीने केलेल्या या आंदोलनात शासनाच्या यादीतील पात्र निराधारांना तुटपुंजे मानधन मिळत असल्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणीही करण्यात आली. शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी, शेतमजुरी आणि निराधारांवर चटणी भाकरी खाण्याची वेळ आली आहे.
हे अधोरेखित करण्यासाठी हे अनोखे चटणी भाकरी आंदोलन केल्याचे यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केलं. शासनाचे लक्ष वेधण्यासाठीआंदोलन औसा येथील तहसील कार्यालयापुढे करण्यात आले.
निराधारांच्या मानधनात जगणे कठीण असल्याने महिना तीन हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी होत आहे याबाबतीत अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करुन ठोस निर्णय राज्य शासनाने घेतला नसल्याने आज औसा तालुका दुष्काळ संघर्ष समितीच्या वतीने स्वातंत्र्य दिनी औसा तहसील कार्यालयासमोर चटणी भाकरी आंदोलन करुन दुष्काळ जाहीर करावा निराधाराना महिना तीन हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.