शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूरमधल्या उद्योग भवन परिसरातील संकल्प बुक डेपोला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हे दोन मजली दुकान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. आगीमध्ये दुकानाचं जवळपास ९५ लाखांचं नुकसान झालं आहे. पुस्तक दिनाच्याच दिवशी लाखोंची पुस्तक जळल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुस्तकांशिवाय या दुकानामध्ये प्रिंटिगची दोन मशीन होती. या मशीनही आगीत जळाल्या आहेत. या आगीचे लोट पाचव्या मजल्यापर्यंत पसरले होते. लॉकडाऊनमुळे सगळीकडे सामसूम त्यात मध्यरात्रीनंतर ही आग लागल्यामुळे समजण्यास उशीर झाला. साडेतीन तासानंतर अग्निशमक दलाने ही आग आटोक्यात आणली.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. संकल्प बुक डेपोतील जवळपास ९५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचे मालक प्रशांत ठाकुर यांनी दिली आहे. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये दुकान बरेच दिवस बंद होतं. या काळात दुकानातले सगळे स्वीच बंद होते. उंदरांनी वायर कुरतडून शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज दुकानाच्या मालकांनी व्यक्त केला आहे.