वादळी वारे-अवकाळीचा १३४६ भाविकांना फटका

वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे हे भाविक ज्या मंडपात राहत होते ते मंडप, पत्र्याच्या शेड उडून गेले. 

Updated: Apr 15, 2020, 07:28 AM IST
वादळी वारे-अवकाळीचा १३४६ भाविकांना फटका title=

शशिकांत पाटील, झी २४ तास,, लातूर :  लातूर जिल्ह्यालाही काल सायंकाळी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला. ज्यामुळे पिकं आणि फळबागांना याचा फटका तर बसलाच पण याशिवाय निलंगा तालुक्यातील राठोडा गावातील महानुभाव पंथाच्या १३४६ संन्यासी भाविकांना बसला. काल सायंकाळी जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे हे भाविक ज्या मंडपात राहत होते ते मंडप, पत्र्याच्या शेड उडून गेले. 

वादळी वाऱ्याने अगदी होत्याचे नव्हते केले. भाविकांचे सामान, कपडे तसेच त्याठिकाणी असलेले अन्न धान्य ही मुसळधार अवकाळी पावसामुळे भिजून गेले. त्यामुळे या भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागलं. हे भाविक जाधववाडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथील आश्रमातून २६ फेब्रुवारीपासून ते २९ मार्च पर्यंतच्या सत्संगासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. 

मात्र लॉकडाऊनमुळे  ते इथेच राठोडा गावात अडकून पडलेले आहेत. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करून हे भाविक प्रशासनाच्या देखरेखीखाली, सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी करून इथे राहत होते. 

काल रात्रीच्या पावसामुळे या भाविकांना गावातील शाळेत तसेच महिलांना गावातील नागरिकांनी आश्रय दिला. आज दुपारी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गावास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. 

गावातच एका दुसऱ्या ठिकाणी भाविकांची टेन्ट आणि पत्र्याच्या शेडमध्ये खाण्या-पिण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली  याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे सर्वानी पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. 

दरम्यान महानुभाव पंथाच्या या साधूंनी जुन्नर जाधववाडी येथील आश्रमात परत पाठविण्याची मागणी केली आहे.