उल्हासनगरच्या महापौर निवडणुकीत महाविकासआघाडीचा भाजपला धक्का

उल्हासनगरमध्ये भाजपमध्ये बंडखोरी

Updated: Nov 22, 2019, 01:42 PM IST
उल्हासनगरच्या महापौर निवडणुकीत महाविकासआघाडीचा भाजपला धक्का title=

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकासआघाडीने सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव केला आहे. महापौर निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडल्याने भाजपला पराभवाचा धक्का बसला. भाजपमधील ओमी कलानी गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात जात महाविकासआघाडीला पाठिंबा दिल्याने सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाचा धक्का बसला. तर उपमहापौरपदी आरपीआय आठवले गटाचे भगवान भालेराव विजयी झाले आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. पण ऐनवेळी ओमी कलानी गटाच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली.

उल्हासनगर महापालिकेत सुरुवातीला कोणाकडेच बहुमत नव्हतं. साई पक्ष हा किंगमेकरच्या भूमिकेत होता. त्यामुळे भाजपने खेळी करत साई पक्षालाच भाजपमध्ये विलीन करुन घेतलं. महापौरपदासाठी भाजपकडून जमनू पुरस्वानी, शिवसेनेकडून लीलाबाई आशान आणि साई पक्षाकडून जीवन ईदनानी  यांनी अर्ज दाखल केला होता. महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ४० जागांची आवश्यकता होती. 

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे ३२, साई पक्षाचे १२, शिवसेनेचे २५ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, काँग्रेसचा १, रिपाइं आणि इतर ४ अशी नगरसेवकांची संख्या आहे.