'बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी', आदित्य ठाकरेंच्या टीकेवर रामदास कदम संतापले, 'सत्ता आली तर दिशा सालियन...'

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर कदमांनी आदित्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.    

शिवराज यादव | Updated: Nov 15, 2024, 08:44 PM IST
'बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी', आदित्य ठाकरेंच्या टीकेवर रामदास कदम संतापले, 'सत्ता आली तर दिशा सालियन...' title=

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं सर्वच राजकीय नेते जोरदार प्रचार करताना दिसतायेत. यात साहजिकच शाब्दिक वार-पलटवार यांना धार चढली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर कदमांनी आदित्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

आपलं सरकार येतंय बर्फाच्या लादीवर झोपावण्याची जबाबदारी माझी असेल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर केलेली टीका कदमांना चांगलीच झोंबली आहे. आदित्य यांच्या टीकेला रामदास कदम यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा करतोस, तुझी लायकी आहे का असं बोलण्याची? असा थेट हल्लाबोल कदमांनी आदित्य यांच्यावर केला आहे. तसंच पुन्हा सत्ता आल्यास दिशा सालियन प्रकरण  काढण्याची धमकीही कदमांनी दिली. 

आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी रामदास कदमांवर जहरी टीका केली होती. मी लहानपणापासून अनेकांना काका म्हणत होतो. आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारीही माझी असेल, असा इशारा आदित्य यांनी त्यावेळी दिला होता

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2019च्या निवडणुकीत सर्व जागा शिवसेनेच्याच निवडून आल्या होत्या . आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. त्यातच ठाकरे-कदम यांच्यात झालेल्या शाब्दिक वारांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.