विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत एकहाती वर्चस्व; भाजपच्या खेळीमुळे लातूरच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

लातूरमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसच्या अमित देशमुखांविरोधात भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवलंय. स्थानिक मुद्यांना घेऊन निवडणुकीतला प्रचार सुरू आहे. लातूर शहर मतदारसंघात सध्याची काय परिस्थिती आहे. पाहुयात, या रिपोर्टमधून.

वनिता कांबळे | Updated: Nov 16, 2024, 12:05 AM IST
विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत एकहाती वर्चस्व; भाजपच्या खेळीमुळे लातूरच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  लातूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत लातूर शहर मतदारसंघावर कॉंग्रेसचं एकहाती वर्चस्व राहिलंय. २००९, १०१४, आणि २०१९ अशा सलग तीन वेळा अमित देशमुखांनी या मतदारसंघात कॉंग्रेसचं वर्चस्व कायम ठेवलं. आता चौथ्यांदा अमित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. अमित देशमुख यांच्या विरुद्ध भाजपनं खेळी करत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. त्यामुळे या निवडणुकीत आता देशमुख विरुद्ध चाकूरकर असा सामना रंगलाय.. तर दुसरीकडे लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख दुसऱ्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरलेत.

कचरा आणि पाणी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जात आहे. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय तर अनेक वर्षापासून लातूरमध्ये जिल्हा रुग्णालय नाही. त्यामुळे पाणी कचरा आणि जिल्हा रुग्णालयासारखे विषय घेऊन मी जनतेसमोर जाणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी दिलीय.

लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर देशमुख कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. एकाच पक्षात राहूनही वर्षांनुवर्षे मनात असलेली देशमुखविरोधी खदखद यावेळी चाकूरकर कुटुंबातील उमेदवारांमुळे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख यंदा गड राखणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.