विधान परिषद पोट निवडणूक । धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचा विजय, काँग्रेसला धक्का

धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी (Dhule-Nandurbar Legislative Council by-election) भाजपने (BJP) विजय मिळवला आहे.  

Updated: Dec 3, 2020, 04:34 PM IST
विधान परिषद पोट निवडणूक । धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचा विजय, काँग्रेसला धक्का

धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी (Dhule-Nandurbar Legislative Council by-election) भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेसला मोठा फटका बसला. जास्त मतदान असूनही काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्याची बोलले जात आहे.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल हे विजयी झाले आहेत. १ डिसेंबरला या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणीअंती भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारल्याचे दिसून आले. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली.  

अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. त्यात महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले असल्याचे दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतेच मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचेही चित्र दिसत आहे. कारण महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते होती पण अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही.  

धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी आठ वाजता मतदान मोजणी प्रक्रिया सुरू झाली. मात्र दहा वाजेपर्यंत निकाल देणे अपेक्षित होते. परंतु निकाल येण्यास उशिर झाला. भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सरळ सामना या निवडणुकीत होता. भाजपकडून अमरिश पटेल तर महाविकासआघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात होते. ४३७ पैकी ४३४ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर जी माहिती समोर आली आहे त्यावरून ही निवडणूक केवळ औपचारिकताच असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे अपेक्षित लक्ष दिला नसल्याचे चित्र वेगळे दिसून आले.