आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील इटोली गावात बिबट घरात शिरल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान बचावकार्य सुरू असताना अचानक बिबट्यासमोर येऊन घरमालक महिलेने गोंधळ घातला. बचाव दलाच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील इटोली गावात घडली. गावातील कुत्र्याच्या मागावर असताना बिबट्या गावात शिरला.
लताबाई देवतळे या महिलेच्या घरात बिबट शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री ११ वाजता वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर पहाटे ४ वाजता बिबट्याला जंगलात पिटाळण्यात यश आले. बिबट्याला बेशुध्द न करता जंगलात पिटाळण्यात यावा अशी वनविभागाची योजना होती.
या साठी बिबट असलेल्या खोली पुढे हिरवी जाळी लावून आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंर बिबट बाहेर निघण्याची प्रतीक्षा सुरू होती. पण अचानक लता देवतळे यांनी ग्रीन नेट बाजूला सारून बिबट्या पुढे गोंधळ घालायला सुरूवात केली.
बिबट्याला गोळ्या घाला अशी मागणी त्यांच्या कडून वारंवार सुरू होती. त्यांच्या गोंधळामुळे बचाव कार्यात अडचणी निर्माण होत होत्या. पण बचाव दलाच्या सदस्यांनी तातडीने दार लावले म्हणून पुढील अनर्थ टळला. नंतर फटाके फोडून दार उघडे ठेवत बिबट्याला जंगलात पिटाळण्यात वनपथकाला यश आले.