Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरेंच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलीस स्टेशनमध्ये गर्दी

Maharashtra Assembly Election Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असली तर उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींवर विशेष लक्ष असेल. याचप्रमाणे दिवसभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स तुम्हाला येथे जाणून घेता येतील...

Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरेंच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलीस स्टेशनमध्ये गर्दी

19 Nov 2024, 08:15 वाजता

अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाची पहिली प्रतिक्रिया

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

19 Nov 2024, 08:15 वाजता

मुंबईत 76 क्रिटिकल मतदान केंद्रे; पण क्रिटिकल मतदान केंद्र म्हणजे काय?

मुंबई व उपनगरातील ज्या मतदान केंद्रांवर मागील निवडणुकांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे, अशा 76 केंद्रांना आता क्रिटिकल मतदान केंद्रे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील 13 केंद्रे शहर विभागात, तर 63 केंद्रे उपनगरात असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या 6 निकषांप्रमाणे या केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून, यंदा येथील मत टक्का वाढविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती गगराणी यांनी दिली.

19 Nov 2024, 08:10 वाजता

उद्या मुंबई मेट्रो उशीरापर्यंत धावणार

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेत कामावर पोहोचता यावे, तसेच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर घरी जाता यावे यासाठी मेट्रो अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व मेट्रो 2 अ आणि गुंदवली ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेवर 20 नोव्हेंबरला मेट्रो गाड्या पहाटे लवकर आणि रात्री उशिरापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानादिवशी पहिली मेट्रो गाडी पहाटे 4 वाजता स्थानकातून सुटेल. तर, शेवटची गाडी मध्यरात्री 1 वाजता स्थानकातून सुटणार आहे, अशी माहिती महा मुंबई मेट्रोकडून देण्यात आली. तसेच या वाढीव कालावधीत दर 20 मिनिटांनी गाडी धावेल.

19 Nov 2024, 08:10 वाजता

मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार की नाही? मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही दृष्टीने बेकायदेशीर नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार देताना या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली.

19 Nov 2024, 08:07 वाजता

महाराष्ट्रातील 'या' भागात पारा 12.6 अंश सेल्सिअसवर

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) नगर येथे राज्यात सर्वांत कमी 12.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज असून, राज्यात किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. 

19 Nov 2024, 08:07 वाजता

विधानसभा निवडणुकीनंतर BMC मध्ये अभियंता भरती; ऑनलाइन अर्ज 26 नोव्हेंबरपासून उपलब्ध

मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार 11 नोव्हेंबरला सुरू होणारी ऑनलाइन अर्जप्रक्रिया आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. मुंबई महापालिकेत गेल्या चार-पाच वर्षांपासून भरती न झाल्याने कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी अभियंता संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

19 Nov 2024, 08:04 वाजता

निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार

राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत. राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे 9 हजार बस 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत.

19 Nov 2024, 08:04 वाजता

मुंबईतलं मतदान वाढणार? इतके मुंबईकर मतदानासाठी पात्र

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत तब्बल 2 लाख 91 हजार 87 मतदार वाढले आहेत. मुंबईत यंदा 1 कोटी 2 लाखाहून अधिक मतदार आपले मत नोंदवणार आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश येणार का हे मात्र मतदानाच्या दिवशीच समजू शकणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सुमारे 47 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढणार का याबाबत उत्सुकता आहे.

19 Nov 2024, 08:01 वाजता

मुंबईत थंडीची चाहूल! पारा घसरण्याचे संकेत

मुंबई शहर, तसेच उपनगरांत पहाटे किंचीतसा गारवा असला तरी तापमान हळूहळू वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रांत सोमवारी कमाल तापमान सरासरी दोन अंशाहून अधिक होते. याचबरोबर कुलाबा येथील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले गेले. मुंबईच्या किमान तापमानात दोन दिवसांनी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमान १८ – २० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

19 Nov 2024, 08:00 वाजता

ठाकरे कुटुंब आज तुळजापूरमध्ये

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरचा दौरा करणार आहेत.