Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील 'या' शाळांना सुट्टी जाहीर

राज्यभरातील महत्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील 'या' शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Breaking News LIVE: राज्यभरातील महत्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

21 Jul 2024, 11:51 वाजता

रायगडातील बीचेस आता होणार चकाचक, किनारा स्‍वच्‍छतेसाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर

पर्यटकांचे आकर्षण ठरणारे रायगड जिल्‍हयातील किनारे स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी आता जर्मन तंत्रज्ञानावर आधारीत यंत्रांचा वापर केला जाणार आहे. महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे रायगड जिल्‍हयासाठी ट्रॅक्‍टर पूल बीच टेक मशिन्‍स उपलब्‍ध झाल्‍या आहेत. अलिबाग समुद्रकिनारी या यंत्रांचे प्रात्‍यक्षिक घेण्‍यात आले. या मशिनला खालच्‍या बाजूला चक्राकार रोलर देण्‍यात आला आहे. हे रोलर वाळूत घुसवून किनारयावरील कचरा बेल्‍टव्‍दारे जोडलेल्‍या कचरा पेटीत पडतो कचरयासोबत आलेली वाळू गाळून पुन्‍हा किनारयावर टाकली जाते. एक मशिन तासला अडीच एकत्र क्षेत्र साफ करून 1 ते 2 टन कचरा गोळा करते. सध्‍या 4 मशिन्‍स उपलब्‍ध झाली असून ती श्रीवर्धन, नागाव, किहीम आणि काशीद या चार किनारयांवर स्‍वच्‍छतेचे काम करतील.

21 Jul 2024, 10:24 वाजता

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पोलीस मैदानात

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असताना त्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता थेट कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिस खड्डे बुजवण्यासाठी मैदानात उतरून मेहनत घेत असल्याचे वसई विरार मध्ये पहायला मिळाले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी शनिवारी दुपारी पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व त्याच्या सहकारी पोलिसांनी पेल्हार फाटा भागातील रस्त्यांवरील फावडे आणि घमेल्याच्या मदतीने खड्डे भरले.मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत.

21 Jul 2024, 09:20 वाजता

पोलीस कोठडीत देण्यात येणारे जेवण बेचव, मनोरमा खेडकरांची तक्रार 

पोलीस कोठडीत देण्यात येणारे जेवण बेचव असल्याची तक्रार मनोरमा खेडकर यांनी केली आहे. शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मनोरमा खेडकर यांना देण्यात येणारे जेवण बेचव असल्याचे त्यांनी न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलंय.  पोलीस कोठडीत ही मनोरमा खेडकर यांचा रुबाब पाहायला मिळतोय. असे असताना पोलिसानी जेवण बेचव असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

21 Jul 2024, 07:42 वाजता

गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे एक मीटरने उघडले

भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागासह दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी आणि पवनीजवळील गोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यात 23 दरवाजे एक मीटरने तर १० दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाच्या पलीकडे असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहेत. शनिवारी गोसेखुर्द धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढ होेत असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

21 Jul 2024, 07:03 वाजता

इराण्णाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
 

 लातूर नीट पेपर फुटी प्रकरणातील इराण्णा कोनगुलवार हा कुटुंबासह अजून ही फरार आहे. एटीएस , लातूर पोलिस आणि त्यानंतर सीबीआय ने देखील तपास केल्यानंतरही इरण्णा कोणाच्याच हाताला लागला नाही. या आधी जलील पठाण ,संजय जाधव आणि मुख्य आरोपी गंगाधरला सीबीआय ने ताब्यात घेऊन त्यांची सध्या न्यायालयीन कोठड़ी सुरु आहे. या दरम्यान इरण्णा ने वकीला मार्फत लातुरच्या कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय. त्यामुळे आता इराण्णा चा शोध लातूर पोलीसांच्या मदतीने CBI घेत आहे.आणी इराण्णाला शोधन हेच CBI चे पुढचे उद्दीष्ट आहे. तर दुसरीकडे जलील पठान आणि संजय जाधव यांनी जामिनासाठी अर्ज केलाय. दरम्यान नेहमी आजारी असलेल्या गंगाधारच्या न्यायालयीन कोठड़ीत वाढ करण्यात आली आहे...

21 Jul 2024, 06:59 वाजता

गुरु पौर्णिमेच्या पर्वावर भक्तांची मांदियाळी....

आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस त्यानिमित्त शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन सुद्धा करण्यात आल आहे. आज सकाळपासूनच शेगावच्या मंदिर परिसरात भाविकांचा माेठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी भक्तगण श्रींच्या दर्शनासाठी शेगावी दाखल होत असतात. यादिवशी गुरुचा आशीर्वाद घेऊन अनेकजण नवीन कामाला देखील सुरुवात करतात. आपली इच्छा बाबांकडे प्रकट करतात. गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेणयासाठी भाविक शेगावला येत असतात. आजही येथे मोठ्या संख्येने भाविक आले आहेत.

21 Jul 2024, 06:57 वाजता

संततधार पावसामुळे वारणा नदी पात्रा बाहेर, शेतात घुसले वारणेचे पाणी

सांगलीच्या शिराळा तालुक्यासह चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणार संततधार पाऊसामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे वारणा नदीवरील अनेक छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत,काल पासून वारणा नदीवरील मांगले-सावर्डे पूल पाण्याखाली गेला आहे,त्यामुळे कोल्हापूरच्या शाहूवाडी व शिराळा तालुक्याचा जवळचा संपर्क तुटला आहे.तर वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे,यामुळे वारणा नदीचे पाणी शेतात घुसले आहे.ऊसासह सोयाबीन व इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

21 Jul 2024, 06:42 वाजता

जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.कालपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह ईतर मागण्यांसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केलं आहे.राज्य सरकारने मराठा समाजाला सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

21 Jul 2024, 06:41 वाजता

'त्या' मित्राच्या हितासाठी उद्धव ठाकरेंची अदानींवर चिखलफेक- शेवाळे 

आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत निराधार आरोप केले" अशी टीका शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. तसेच गेल्या आठवड्यात मुंबईत जो शाही विवाह सोहळा पार पडला, ' त्या ' मित्राच्या हितासाठी माननीय उद्धवजी हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून आदानी वर बोगस आरोप करत आहेत, असाही हल्ला शेवाळे यांनी चढविला. चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेवाळे यांनी ही टीका केली.