Maharashtra Breaking News LIVE Updates : बीड सरपंच हत्याकांडातील घडामोडींना वेग आला आहे. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील व देशातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात.
7 Jan 2025, 20:50 वाजता
देशमुख प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन : धनंजय देशमुख
देशमुख कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
7 Jan 2025, 20:01 वाजता
देशमुख कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहे.
7 Jan 2025, 19:08 वाजता
आम्हाला न विचारता याचिका दाखल, मला न्याय पाहिजे: धनंजय देशमुख
आम्हाला न विचारता याचिका दाखल करण्यात आली आहे. पुन्हा अशा घडू नये म्हणून आम्ही न्याय मागत असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
7 Jan 2025, 18:55 वाजता
संतोष देशमुख कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
संतोष देशमुख कुटुंबीय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने ही भेट होणार आहे.
7 Jan 2025, 18:14 वाजता
संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी जालन्यात 10 जानेवारीला मोर्चा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 10 जानेवारीला जालन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीये.
7 Jan 2025, 17:57 वाजता
मल्टिस्टेट बँक संदर्भात अजित पवार यांच्यासोबत चर्चा : सुरेश धस
मल्टिस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडल्याची माहिती सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीनंतर दिली आहे.
7 Jan 2025, 17:33 वाजता
सुरेध धस अजित पवार यांच्या भेटीला
राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता सुरेश धस हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. या भेटीमध्ये ते बीड प्रकरणावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
7 Jan 2025, 17:02 वाजता
खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा दावा
खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत केला. त्याबाबत बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिलीय सुरेश धस हे अभ्यास करून बोलणारे नेते आहेत. त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलतात. शासनाने आणि पोलीस यंत्रणेने याचा तपास करायला पाहिजे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय.
7 Jan 2025, 16:33 वाजता
वाल्मिक कराड शरण आलेली गाडी CID च्या ताब्यात
पुणे येथील CID कार्यालयात वाल्मीक कराड ज्या स्कॉर्पियो गाडीतून आला होता ती गाडी आता सीआयडीनं ताब्यात घेतलीये. ही गाडी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावे असल्याची माहिती आहे. दरम्यान आता याबाबत सीआयडी नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
7 Jan 2025, 16:09 वाजता
चर्चगेट येथील स्टारबक्सचं नाव मराठीत नसल्याने ठाकरे पक्ष आक्रमक
मुंबईतील चर्चगेटमध्ये स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. यावेळी कार्यकर्त्यांनी स्टारबक्स कॅफेच्या बोर्डाला काळं फासत आंदोलन केलं. मरीन लाइन्स पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी माणसाची गळचेपी होताना पाहायला मिळतेय. त्यातच स्टारबक्स कॅफेचं नाव मराठीत नसल्याने ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. महानगरपालिका निवडणुकांआधी मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयावरुन ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना सध्या पाहायला मिळतेय.