30 Aug 2024, 20:12 वाजता
Badlapur News : जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू! बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा
बदलापूरमध्ये सकल मराठा समाजाने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आंदोलन केले. यावेळी सदर घटनेचा निषेध करताना "शिवरायांचा कमकुवत पुतळा तयार करून तो पडण्यास कारणीभूत ठरलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याची बोटं जो कोणी छाटून आणेल, त्याचा बदलापूरमध्ये जाहीर सत्कार करू", अशी घोषणा यावेळी सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी केली आहे. तसेच सकल मराठा कार्यकर्त्यांनी दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या पत्रात केली आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
30 Aug 2024, 18:51 वाजता
मीरा भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
मीरा भाईंदरमध्ये भाजप जिल्हा सचिव राजन पांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. राजन पांडे यांच्या पोटात व मानेवर चाकू खुपसण्यात आला असून यात अजून एक जण जखमी झाला आहे. भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीत सदर घटना घडली असून राजन पांडे यात गंभीर जखमी झाले आहेत. पांडे यांना मिरारोड मधील वॉकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे स्थानिक नेते रवी व्यास यांचे समर्थक म्हणून राजन पांडे यांना ओळखलं जातं. अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून हल्ला करणाऱ्याचे नाव विनोद राजभर असे सांगण्यात येत आहे.
30 Aug 2024, 15:52 वाजता
पीओपी गणेशमूर्तींना तूर्तास बंदी नाही, सर्वसामान्यांना हायकोर्टाचा दिलासा
7 सप्टेंबर रोजी घरोघरी गणपतीचं आगमन होणार असून यासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मात्र पीओपी गणेशमूर्तींबाबत ग्राहक आणि मूर्तिकारांमध्ये संभ्रमावस्था होती. अखेर मुंबई हायकोर्टाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. पीओपी गणेशमूर्तींना तूर्तास बंदी नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केलंय. मात्र येत्याकाळात पीओपीबाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं तयार केलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जावं अशा सूचना कोर्टाने दिल्या. तसेच यापुढे गणेश मंडळांना परवानगी देतानाचा पीओपी बंदीची अट घालणं आवश्यक असल्याचं हायकोर्टाने नमूद केलं आहे.
30 Aug 2024, 15:21 वाजता
वाढवण बंदर देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचे भूमिपूजन पार पडले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बंदर देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट होईल असे म्हंटले. मोदी भाषणादरम्यान म्हणाले की, "भारताच्या विकासासाठी हा मोठा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले गेलेत, यासाठीच वाढवण बंदराचे भूमिपूजन केले. वाढवणं बंदर हे देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट होईल. देशात सध्या जेवढे कंटेनर येतात जातात, त्यापेक्षा जास्त कंटेनर इथं येतील जातील. या क्षेत्राची ओळख आता फोर्टप्रमाणे पोर्ट अशी होईल". तसेच मोदी म्हणाले की, "दिघी पोर्ट विकासालाही मंजुरी देण्यात आलीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे प्रतिक बनेल. तसेच मच्छिमारांसाठी 700 कोटींची योजना आणली गेलीये".
30 Aug 2024, 15:13 वाजता
मी शिवरायांच्या चरणी डोकं ठेऊन माफी मागतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी पालघर येथील वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. काही महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण करण्यात आले होते. मात्र सोमवारी हा पुतळा कोसळला ज्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
30 Aug 2024, 14:51 वाजता
वाढवण बंदरासाठी केंद्राकडून 76 हजार कोटींची तरतूद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी पालघर येथील वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणा दरम्यान वाढवण बंदराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. मुख्यमंत्री या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, "वाढवण बंदरासाठी केंद्राकडून 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे".
30 Aug 2024, 14:34 वाजता
जेएनपीटीपेक्षा तिप्पट मोठं बंदर इथं होतंय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी पालघर येथील वाढवणं बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी वाढवण बंदरासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मोदींचे आभार मानले. फडणवीस भाषणादरम्यान म्हणाले की, "जेएनपीटीपेक्षा तिप्पट मोठे बंदर इथं होणार आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर कायम राहील. बंदर होणार नाही असं सर्वांना वाटत होतं मात्र मोदीजींच्या प्रयत्नातून हे बंदर होतंय. तसेच या बंदराला राष्ट्रीय बंदराचा दर्जा दिला जाणार आहे, या वाढवण बंदरामुळे पंतप्रधान मोदी यांचे नाव इतिहासात नोंद होईल". "या परिसरात एअरपोर्टही व्हावे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच मच्छिमारांसाठी विविध सोयी उपलब्ध करू. मच्छिमार,आदिवासींना ट्रेनिंग देवून इथं काम दिले जाईल" असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यान दिलं.
30 Aug 2024, 14:15 वाजता
Vadhavan Port : इथल्या एकाही बांधवाला वा-यावर सोडणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवणं बंदराचे भूमिपूजन पार पडणार आहे. यासाठी शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी पालघरमध्ये दाखल झाले. या भूमिपूजन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना म्हंटले की, '35 वर्षांपासून हे बंदर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. मोदी साहेबांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत वाढवण बंदर प्रकल्प मंजूर केला, या बंदरामुळे लाखो रोजगार निर्माण होतील. तसेच इथल्या एकाही बांधवाला वा-यावर सोडणार नाही असे वचन देतो'. अजित पवारांनी या बंदराचे वैशिष्ट्य सांगताना म्हंटले की, 'समुद्राच्या आत 10 किमी हे बंदर होणार असून हे जगातील 10 बंदरांपैकी एक असेल'.
30 Aug 2024, 13:38 वाजता
India Breaking News LIVE : शरद पवारांनी Z प्लस सुरक्षा नाकारली
केंद्र सरकारनं दिलेली झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारलीये.. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर गृह मंत्रालयाचे अधिकारी दिल्ली इथं शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.. 15 अधिका-यांनी याबाबत शरद पवारांशी चर्चा केली.. मात्र त्यानंतर शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला..
30 Aug 2024, 13:13 वाजता
Kolhapur Gokul Live : गोकुळच्या सभेत गोंधळ
कोल्हापुरात गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला आहे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आहेत. गोकुळ दूध संघात मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील याची एकत्रित सत्ता आहे. हे दोन्ही नेते राज्यात विरोधात तर गोकुळ दूध संघात एकत्र आहेत. विरोधक हळूहळू गेटच्या बाहेर जमू लागले आहेत.