Breaking News LIVE : राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या 8 दिवसात- जयंत पाटील

Maharashtra Breaking News LIVE: राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...

Breaking News LIVE : राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या 8 दिवसात- जयंत पाटील

6 Oct 2024, 16:17 वाजता

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड

दिल्लीमध्ये होऊ घातलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पुण्यात केलीय.ताराबाई या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन, लेखन केले आहे.

6 Oct 2024, 15:32 वाजता

मुख्यमंत्र्यांची चेंबूरमधील अग्नितांडवात झालेल्या दुर्घटनास्थळाला भेट

मुख्यमंत्र्यांनी चेंबूरमधील अग्नितांडवात झालेल्या दुर्घटनास्थळाला भेट दिली. तसंच पीडीत परिवारातील बेनीलाल गुप्ता यांची विचारपूस केली.. या घटनेची चौकशी केली जाईल आणि योग्य तो निर्णय देखील घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं... सरकार या पीडित कुटुंबासोबत असून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मयताला पाच लाख रुपये, अशी एकूण 35 लाखांची मदत शासनाच्या वतीने दिली जाईल. तसेच जे जखमींवरील सर्व खर्च हा शासनाकडून केला जाईल असे निर्देश त्यांनी दिले.. 

6 Oct 2024, 15:30 वाजता

उद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्त्व करावं - राऊत

उद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्त्व करावं,अशी इच्छा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. मोदी,शहा यांनी ज्यापद्धतीनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदापासून दूर केल्यानंतर आमच्या काळजामध्ये घाव झाला आहे. आम्हाला हा घाव भरून काढायचा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व करावं ही नागरिकांची आणि शिवसैनिकांची इच्छा असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. 

6 Oct 2024, 15:29 वाजता

काँग्रेसविरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात राजकारण चांगलंच तापलंय.. काँग्रेसविरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आलीय...यापूर्वी काँग्रेस विरोधात पोस्टरबाजी करण्यात येत होती.आता पुन्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाखाली पोस्टरबाजी करण्यात आलीय.

6 Oct 2024, 15:28 वाजता

चालत्या कंटेनरचं चाक अचानक निखळून

नाशिकमधील सातपूर MIDC परिसरात चालत्या कंटेनरचं चाक अचानक निखळून,  चारचाकी वाहनावर आदळलंय.... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही... मात्र यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...  या  संपूर्ण  घटनेचा थरार  CCTV कॅमे-यात कैद झालाय.... तसंच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे...

6 Oct 2024, 13:38 वाजता

संभाजी राजे छत्रपतींना मुंबई पोलिसांनी अडवलं

चला शिवस्मारक शोधायला घोषणा देत मुंबईत आलेल्या संभाजी राजे छत्रपतींना मुंबई पोलिसांनी अडवलं...गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांकडून संभाजी राजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांची धरपकड...

6 Oct 2024, 12:03 वाजता

शरद पवारांच्या भेटीसाठी इच्छुक उमेदवारांच्या रांगा

पुण्यात आज राजकीय घडामोडींना वेग आलाय. शरद पवार आज विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. मार्केट यार्डातील गुलटेकडीमध्ये 11 ते 5 दरम्यान मुलाखती होणार आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसह अनेकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोतीबाग कार्यालयासमोर गर्दी केलीय. वर्धातून निलेश कराळे गुरुजी, बीडच्या पूजा मोरे तर जुन्नरमधून सत्यशील शेरकर यांच्या उमेदवारी मागण्यासाठी अनेक कार्यकर्ते पवारांच्या भेटीला आलेत.

6 Oct 2024, 12:01 वाजता

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा उद्या दिल्ली दौरा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौरावर असणार आहेत. अमित शहांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दिल्लीत बैठक बोलवली आहे. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

6 Oct 2024, 12:01 वाजता

मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ 

धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. तुळजापूरच्या सिंधफळ इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काम अपूर्ण असतानाच उद्घाटन का करता? असा सवाल करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राणा जगजितसिंह पाटलांना जाब विचारला. यावेळी आमदार राणा आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. तर हा कार्यक्रम लोकर्पणाचा नाही, असं स्पष्टीकरण आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिलंय. हा राजकीय डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

6 Oct 2024, 11:59 वाजता

पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट, सायरन बसवणार

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणानंतर पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट, सायरन बसवणार, असा पोलिसांचा निर्णय घेतलाय. टेकड्यांवरील लुटमारीच्या घटना थांबवण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. या उपयामुळे आपत्कालीन परिस्थीतीत नागरिकांना मदत मिळणार आहे.