Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज पाचवा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...
20 Dec 2024, 11:29 वाजता
Breaking News : मोठी बातमी! लोकसभा अनिश्चित काळापर्यंत तहकूब
लोकसभा हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी सभागृहात गदारोळ केल्यामुळे लोकसभा अनिश्चित काळापर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
20 Dec 2024, 11:24 वाजता
Live Updates : माणगाव पुणे मार्गावर ताम्हीणी घाटात खासगी बसला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
माणगाव ते पुणे मार्गादरम्यान ताम्हिणी घाटात शुक्रवारी एका खासगी प्रवासी बसला अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला उलटली.
अपघातात एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून यात तब्बल 25 जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे ही बस निघाली होती
लग्न समारंभासाठी वऱ्हाड बस मधून प्रवास करत होते. माणगाव पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून स्थानिक यंत्रणेकडून मदत कार्य सुरू आहे.
20 Dec 2024, 10:42 वाजता
Breaking News : माणगाव ते पुणे मार्गादरम्यान ताम्हिणी घाटात भयंकर अपघात
माणगाव ते पुणे मार्गादरम्यान ताम्हिणी घाटात एका खासगी प्रवासी बसला अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला उलटली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून काही प्रवासी गंभीर जखमी आहेत.
20 Dec 2024, 10:41 वाजता
काँग्रेस विरोधात भाजप आमदार आज पुन्हा आक्रमक, विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन
सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून शुक्रवारी पुन्हा एकदा काँग्रेस विरोधात भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींविरोधात भाजपने हे आंदोलन केले असून विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. काल भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी मुंबईतील काँग्रेसचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला तर आज आमदार देखील विधीमंडळ परिसरात हे आंदोलन करत आहेत.
20 Dec 2024, 09:31 वाजता
राज्यसभेचे सभापती धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस उपसभापतींनी फेटाळली
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस उपसभापतींनी फेटाळली आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात INDIA आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस पाठवली होती. सभापती विरोधी पक्षांना बोलू देत नसून पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला होता INDIA आघाडीच्या 60 हून अधिक खासदारांनी प्रस्तावावर सह्या देखील केल्या होत्या. काँग्रेस, TMC, आप, समाजवादी पक्षाच्या खासदारांच्याही प्रस्तावावर सह्या केल्या होत्या.
20 Dec 2024, 08:32 वाजता
Breaking News : संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल
संसदेत धक्काबुक्की झाल्यानंतर कांग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला. धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे लावण्यात आली आहेत. संसदेत आणि संसद बाहेर गदारोळ घालणाऱ्या खासदार विरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणा-या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी संसदेत आणि प्रवेशद्वारावर कोणतंही निदर्शने करण्यासाठी मनाई केलीय.
20 Dec 2024, 08:25 वाजता
रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीसाठी विजयगड बंगल्यावर
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार रोहित पाटील हे शुक्रवारी सकाळी अजित पवारांच्या भेटीसाठी विजयगड बंगल्यावर पोहोचले. नागपुरात सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून दरम्यान मतदारसंघातील कामासाठी रोहित पाटील उपमुख्यमंत्र्यांना भेटले असल्याची माहिती मिळत आहे.
20 Dec 2024, 08:21 वाजता
मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
गुरुवारी मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. आझाद मैदान पोलिसांनी कलम 74, 118(1), 189 (1)(c), (2), (3) , 190, 191(2),192, 324(3),333, अंतर्गत गुन्हा दाखल केला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवना यांच्यासह 30-40 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 14 भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.